Tuesday, June 28, 2016

विसापूर-अजोड तटबंदी लाभलेला सह्याद्रीतला मणी


        आलो होतो खरा M.A च्या परीक्षेसाठी.पण मध्ये एक मस्त ट्रेक झालाच पाहिजे म्हणून मग विसापूरला जायचं ठरवलं.सोबत आपला जिगरी(nano)होताच.त्यात काऊ आणि कौस्तुभची भर पडली आणि हो ट्रेकक्षितिज सोबत यावेळी आमचा म्होरक्या होता माधवी काकू!!!
            २२ मे ला सकाळी म्हणजे तसे पहाटेच कौस्तुभ आणि काऊच्या गाडीवरून भाजे गावाकडे प्रस्थान केलं.वातावरण खुपच आल्हाददायक होतं.जुन्या हायवे वरून मळवली गाठलं,गरमागरम चहा घेतला आणि विराजला एक फोन केला.टीम ट्रेकक्षितिज आत्ताच जागी झाली होती.नाश्ताच्या वेळेला बरोबर लोहगडवाडीला पोहोचलो.खमंग पोहे,पुन्हा एकदा फक्कड चहा झाला.वातावरण ढगाळ होतं.मंद वारा वाहत होता.काही वेळातच ओळख परेड झाली आणि विसापूर कडे निघालो.जाताना लोहगडची भव्यता जाणवत होती.तटबंदी,विंचूकाटा माची,नेढं जबरदस्त दिसत होतं.

      विसापूरची वाट करवंदांच्या जाळ्यांनी भरून गेली होती.त्यामुळे वेगात जरा फरक पडला.आंबट-गोड चवीने मजा आणली. उजवीकडील रस्त्याने वर गेल्यावर लगेच एक पाण्याचे टाके लागले.अजून तसा उन्हाचा कडाका जाणवत नव्हता.थोड्या रिकाम्या झालेल्या पाणपिशव्या भरून घेतल्या.चढण चालू झाली होती.तटबंदीचे ढासळलेले मोठ-मोठ्या दगडांनी काहीसे दमवले.बाकी वाट मस्त आहे.काही वेळातच किल्ल्यात प्रवेशकर्ते झालो.तिथेच चेतनाने विसापूरचा इतिहास सांगितला.तिला मग मीहि थोडी पुष्टी जोडली.हिरडस-मावळाची ओळख करून दिली.तुंग-तिकोना ,पवना धरण असा मोठा विलोभनीय परिसर डोळ्यांसमोर दिसत होता.

     उजवीकडून वाटेने झेंड्यापर्यंत जाऊन बुरुज पाहून आलो.मुळ ठिकाणापर्यंत परत येऊन डावीकडील तटबंदीच्या कडेकडेने किल्ला पाहण्यास सुरुवात केली.गडावर चुना मळायचे मोठे जाते,एक दारू कोठार,एक पडका वाडा,शंकराचे मंदिर आणि त्याच्या मागे पुष्करणी,त्यासमोरील स्तंभ या कलाकृती पाहण्यासारख्या आहेत.

चुना मळण्याचे जाते

 अजोड तटबंदी



    विसापुरचे आणखी एक वैशीष्ट्य म्हणजे त्यावरील तटबंदी.मी आतापर्यंत पाहिलेली सुंदर तटबंदी.त्याची भव्यता भाजे गावातूनच जाणवते.तिच्यावरील बुरुज,तोफांच्या साठी विशेष योजना लक्ष वेधून घेते.किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठया प्रमाणावर पहावयास मिळतात.यावरून त्यावरील लोकवस्तीची कल्पना येते.किल्ल्याचा विस्तार मोठा आहे. आम्ही शंकराचे दर्शन घेऊन जांभळे खात भाजे लेण्याच्या डोंगरावर उतरण्याचे ठरवले.त्याच मार्गावर मारुतीचे सुंदर शिल्प नजरेस पडते.शंख,घोड्याची नाळ,फुल मारुतीच्या आजूबाजूला शोभून दिसते.देवतेच्या हातातही गदा नसून छानसें फुल आहे.या राजमार्गाने आम्ही भाजे लेण्यांवर उतरलो.काय वर्णन करावे या लेण्यांचे!!! कितीही वेळा पहिले तरी त्यांचे अप्रूप वाटतेच.खडकांमधील कोरीव काम,तेथील पाण्याची टाकी ,गोड,थंडगार पाण्यामुळे मन शांत झाले.बौद्ध लेण्यांमध्ये दिसणारे स्तूप,विहार यांची शार्दुलने उत्तम माहिती दिली.तिथे आलेल्या विदेशी पर्यटकांशी तोशदा जर्मन भाषेत संवाद साधत होती,ऐकायला मस्तच वाटत होतं.पण नंतर सगळे म्हणाले काहीही झालं तरी तोशदा हसली मात्र मराठीत.

मारुतीराया
    
नालासोपारा-पैठण मार्गावरील किल्ल्यांच्या रांगा,मार्गावरील लेण्या,त्यांचे महत्व याचीसुद्धा छान माहिती मिळाली .व्यापारी वर्ग लेण्यांचा,विहारांचा वापर राहण्यासाठी करायचे.. त्यातून देणगी स्वरुपात मदत केली जायची आणि यामुळेच बौद्ध धर्माच्या प्रसारास मदत झाली.
       देवा सरांनी अजून एका मुद्द्यावर प्रकाश टाकला.आपणच बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो की इथे बघण्यासारखं काहीच नाहीये. इथच आपलं चुकते.विसापूर,लोहगड,पवनेचा नितांत सुंदर परिसर,तुंग-तिकोना,पावसाळ्यातील येथील खळाळणारे धबधबे या सगळ्याचे BRANDING केल्यास लोकांनाही याचे ऐतिहासिक  महत्व समजावून सांगणे सोपे जाईल.प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करायला हवेत.
    भाजे लेणी पाहून(वाढदिवस साजरा करून)एक मस्त ग्रुप फोटो शार्दुलने काढला.खाली गावात आल्यावर वडापाव आणि चहाची तल्लफ भागवली गेली.आम्ही लगेच सगळ्यांचा निरोप घेऊन पुण्याकडे निघालो.खूप दिवसांपासून  राहिलेला ट्रेक पूर्ण करून परीक्षेसाठी प्रफुल्लित मनाने निघालो.
TEAM TREKSHITIZ

       भटका श्रेयस....REPORTING FROM विसापूर पायथा....


Thursday, April 14, 2016

जोडगोळीतला एक हिरा--गोरखगड

        हरिश्चन्द्रगडवरील धसक्याने भैरवगडला सुट्टी घेतली पण आता राहवत नव्हतं.जवळजवळ एक महिना होत आला होता.आता ट्रेकची गरजच होती.त्यामुळे गोराखगडला जायची तयारी सुरु केली.आईने सोलापूर वरून ट्रेकिंगचे सर्व सामान पुण्यात पोस्त केले होतेच .मी तेथून सामान घेऊन कल्याणकडे निघालो.प्रथमेशने सोलापुरवरून पकडलेली इंद्रायणी तशीच पुढे continue केली.डोंबिवली ला वेळेत पोचलो,गुजराथी मेस मध्ये राईस प्लेट घेतली.पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि टिळक पुतळ्याजवळ आलो.सगळे एकत्र येण्यासाठी थोडा वेळ गेलाच.११.३० च्या सुमारास डोंबिवली सोडली.

    गप्पा-गोष्टीमुळे झोप झाली नाहीच.काही वेळातच मुरबाड पार करून गोरखगडाच्या पायथ्याशी आलो.वाटाड्याला सोबत घेऊन लगेच गुहेकडे प्रस्थान केले.काही जणांचा पहिलाच रात्रीचा ट्रेक होतं.सुरुवातीला शरीराला सवय होईपर्यंत दमछाक झाली,घामाच्या धारा चालू झाल्या होत्या.गुहेपर्यंत पोहोचायला ३-३.३० वाजले.मध्ये एका ठिकाणी गडाची माहिती दिलेली होती.सातवाहनकालीन बांधकाम असलेली जोडगोळी गोरख आणि मच्छिंद्रगड.मधल्या टप्प्यावर एक साधूबाबा आणि त्यांची कुटी लागते.
       गुहा तशी प्रशस्त आहे.चाळीसजण सहज मावतील.आम्ही sleeping bags काढल्या आणि गार वाऱ्यात पहुडलो.सकाळी ६.३० वाजता जाग आली.बरंच उजाडलं होतं.बाटली घेऊन बाहेर पडलो पण जागेची पंचाईत होती.तिथेच एक जागा बघून उरकून घेतलं.पण आमच्यातले “Andy” महाशय थोडे पुढे गेले आणि येताना मधमाशा घेऊन आले.किशोर काकांनी सांगितलं,तसे संजय काका आणि सचिन त्याच्याकडे धावले.तो आल्यावर आम्ही सर्वानी आमचं शरीर झाकून घेतलं ,जमिनीवर आडवे झालो,धूर केला.तरी काही जणी त्याचा पिच्छा सोडत नव्हत्या.त्याने तशाच अवस्थेत घोंगडी गुंडाळून नाश्ता केला.चहा आणि उपमा वृषालीने मस्त केला होता..GAS  वर आणण्याचे सार्थक झाले.      
ओळख परेड चालू झाली तसे मोशे,काका आणि मोनिश दोर बांधायला पुढे गेले.slings, anchor आणि  helmet सोबत घेऊन पाच-पाच जणांणी चढायला सुरुवात केली.वाठारे काका सोबतीला होतेच.काही वेळातच सगळे शिखरावर डेरेदाखल झालो.दोन-तीन सावलीपुरती झाडे आणि शंकराचे सुंदर मंदिर मन प्रसन्न करीत होते.मच्छिंद्रगाडाचा सुळका पाठीमागे होताच.थोडासा नाश्ता आणि विश्रांती घेतल्यावर उतरायला सुरुवात केली.रस्ता निमुळता आणि पायऱ्या कठीण असल्याने वेळ लागत होता.बारा वाजेपर्यंत गुहेत परतलो.
       आता सगलळे जेवणावर तुटून पडले.माझ्याकडची बाकरवडी,खाकरा,चटणी रात्रीच संपले होते.अश्विनी आणि सचिन SPECIAL मुळे जेवणात मजा आली.पुरणपोळी,गुळपोळी सर्व पदार्थ उपलब्ध होते!!थोडी विश्रांती घेऊन,ट्रेकक्षितिज ची माहिती ऐकुन उतरायला सुरुवात केली.डोक्यावर सुर्यराज,तापलेले दगड,ताशीव पायऱ्या आणि पाठीवर ओझं.
       तरी सर्वानी पटापट COVER केलं.डॉक्टर,किशोर काका,रुचिर सगळे व्यवस्थित उतरत होते.सतत पाण्याचे घोट घेत,पायऱ्या शांतपणे  उतरलो.रात्री कळलं नसलं तरी तशा पायऱ्या कठीणच होत्या.आणि हो,गुहेच्या मागील बाजूस एक गुहा आहे तेथील मूर्ती पाहण्यासारख्या आहेत.
     उन्हं डोक्यावर आली होती.रखरखाट जाणवत होता .शेजारी सिद्धगड साथ देत होता.पायथ्याच्या मंदिरात पोचायला पाच वाजले.गावातच मस्तपैकी चहा आणि पोहे खाल्ले(मी आणि संजय काकाने राहिलेली पुरणपोळी संपवली).आवरून मुंबईकडे कुच केले.आज मुंबईच्या रहदारीचा खरा प्रत्यय आला .कल्याणला मी ,प्रथमेश आणि सव्या उतरलो.खूप अडनिड्या वेळेत आलो होतो.खूप विचार करून TAXI ने कळंबोली आणि तिथून पुणे असा प्रवास करावा लागला.उलट-सुलट पडलं जरा...पण ट्रेकसाठी काहीपण.सोबत दोन मुली होत्या त्यांनी पुण्याला न येता मुंबई मधेच त्यांच्या घरी जाण्याचं ठरवल..


     उन्हाळ्यातील एक ट्रेक चा मस्त अनुभव आला.शरीराची तंदुरुस्ती जोखता आली.तलाठी म्हणून शेवटचा ट्रेक ठरला कारण ३०/०३/२०१६ ला राजीनामा दिला होता!!! ट्रेक लीडर सचिन लादे,सव्यसाची आणि संजय काकांचे आभार.मधमाश्यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले.आनंदला नंतर बरं वाटायला लागलं म्हणून बरं ,नाहीतर सगळ्यांचीच वाट लागली असती!!!  

Monday, March 21, 2016

स्वप्न सत्यात!!! हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने!!!

       नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड...दिवस ठरला...तसं संजय काकांनी आधीच कानावर घातलं होतं.नाशिक स्टेशन ला शाईन पार्क केली आणि कल्याण गाठलं.प्रथमेश आणि पुरंदरे काका भेटले.जेवण आटोपून सगळ्यांची वाट पाहत तिथेच थांबलो.तासाभरातच कल्याण स्टेशन ला सगळे जमले.पण गाडी ठरवली होती त्यात पुरेशी जागा न झाल्याने अजून दोन गाड्या काढाव्या लागल्या.मी संजय सरांसोबत वैद्य काकांच्या गाडीत बसलो.मुरबाडला चहा घेतला आणि लगेच वालीवारे (बेलपाडा)मध्ये दाखल झालो.आश्रमशाळेच्या हॉल मध्ये पथाऱ्या पसरल्या आणि तीन तास स्वर्गात फेरफटका मारून आलो.
       सकाळी सहाच्या आसपास जाग आली.सगळ्यांची आवराआवर चालू होती.आश्रमशाळेतील व्यवस्था मस्त असल्याने काही काळजी नव्हती.कमळूकडे चहा,नाश्ता झाला.’पोलीस पाटील मित्र ‘ डायरी मध्ये ‘निसर्ग सान्निध्य मित्र’ या नावाने संजयकाकाने नोंद केली आणि कोकणकड्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.बहुतेकजण ट्रेकक्षितीजचे सदस्य होते,अनुभवी होते.नळीची वाट सांधणची आठवण करून देत होती..पावसाळ्यात काय अवस्था होत असेल याचा अंदाज आला.हळू-हळू सूर्य डोक्यावर येत होता..खडी चढण असल्याने दमछाक होत होती.दगडाचे मोठे patch असल्याने तसेच dehyadration  च्या भीतीने सारखे पाणी,गाजर,काकडी सेवन चालू होते.दोन-तीन अवघड टप्पे पार करून हरिश्चंद्रगडच्या काहीशा सपाट भागावर पोचलो.इथेच डबे सोडले.सरबत प्यालो.पावभाजी,चिकन,ट्रेक स्पेशल ठेपले पोटात ढकलले.थोडी विश्रांती घेऊन कोकणकड्याकडे कुच केले.इथे आल्यावर नळीची भव्यता जाणवत होती.कोकणकडा पाहिल्यावर आंतरिक शांतता मिळाली.पेटके काही जणांना त्रास देत होते.सुशांत काकाने कोकणकडा rappling चे टप्पे दाखवले.ते वर्षातून एकदा हा उपक्रम घेतातच.काय वर्णावे त्या कड्याचे रूप!!!तिथेच एकाने parachute jumping चा video दाखवला.काळजात धस्स झालं.
     कोकणकड्यावर भास्करचे घर आणि खानावळ आहे.तिथेच मुक्काम करायचा ठरला.आवरून,काही वेळ विश्रांती घेऊन हरीश्चन्द्रेश्वराच्या मंदिराकडे निघालो.तो भाग थोडा खोलगट ठिकाणी आहे.वरून पाहिल्यावर हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृतीचा भास होत होता.मी आणि सचिन मंदिरे निरखून पाहत होतो.ती वैशिष्ट्यपूर्ण पुष्करणी,गणपती मंदिर गुढ वाटत होते.उत्सुकता निर्माण झाली.महादेव मंदिराच्या जवळच खालच्या बाजूला एक मोठे कुंड आहे ज्यात मोठी पिंड आहे.कुंडातील पाणी थंड आणि स्वच्छ आहे.कुंडाच्या बाहेर अंघोळ उरकली.थंड पाण्यामुळे हुडहुडी भरली.बाटल्यांमध्ये पाणी भरून घेतलं आणि कोकणकड्यावर निघालो.गेल्यावर नाश्ता,आकाश निरीक्षणात वेळ कसा गेलं समजलंच नाही.गप्पा मारतच जेवणं आटोपली.भाकरी आणि पिठल्या चा फक्कड बेत होता.पाठोपाठ यजुवेंद्रचे वडील आणि त्यांचा ग्रुप दाखल झाला.नळीची वाट चढायला जवळपास दहा तास लागले.काही वेळातच पुरंदरे काकांशी गप्पा मारता मारता मस्त झोप  लागली.
     रात्री वारा सुसाट होता .सकाळी पोटात हलचल चालू झाल्याने जाग आली.वाघ मारून आलो!!पण काहीतरी गडबड झालीये,हे जाणवत होतं.लगेच चहा घेऊन तारामती,रोहिदास कडे प्रयाण केले.चाल थोडी होती पण उभी चढण होती.एकानंतर एक टेकड्या येतंच होत्या.तारामती वरून खुबे घाटातील अडवलेलं पाणी,माळशेज घाट,आजोबाचा डोंगर,भैरवगड(मोरोशी),MTDC चे RESORT इतका सारा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत होता.त्याच वाटेने पुढे ‘त्या’ मंदिराकडे निघालो.वरून पुष्करणी सुंदर दिसत होती.धावतच मंदिरापाशी पोचलो.इथेच दोन अवलीये भेटले.सायकलवीर प्रीसिलीया मदन आणि सुमित परींगे!!त्यांच्या कथा ऐकून थक्क झालो.नंतर मी आणि सचिनने मोर्चा गुहांकडे वळवला.गणेश गुहा,साहेबांची गुहांची सुंदर रचना लक्ष वेधून घेत होती.काही गोष्टी मनात टिपून ,काहींचा अंदाज लावत पुन्हा कड्यावर आलो.येताना सरबत आणि भज्यांनी सोबत केली.
      जेवण आटोपलं आणि आम्ही परतीच्या तयारीला लागलो.पण माझी तब्येत बिघडत चाललेली मला जाणवत होतं.आमच्या दोन गाड्या बेलपाड्यात असल्याने सहा जणांनी नळीच्या वाटेने उतरण्याचा निर्णय घेतला.त्यांनी लगेचच निघायचा ठरवलं.दिव्यच होतं ते !! ते ठिसूळ झालेले अणुकुचीदार दगड ,त्यात कडक उन ..बापरे!!त्यांना निरोप दिला आणि आम्ही बाकीच्यांनी पाचनई मार्गे उतरण्याच ठरलं.उलटीचा त्रास सुरु झाला  होता.निघतानाच गौरवने सर्वांची हाडे मोकळी केली.
      पायवाट रुळलेली होती.तशी वाट सरळ सोपी होती.महाशिवरात्र जवळ आल्याने ग्रामस्थ डोक्यावर साहित्य  घेऊन गडावर निघाले होते.उन्हाचा तडाखा वाढत चालला होता.एक-दोन ठिकाणी थांबत ,विश्रांती घेत तास-दीड तासात पायथ्याला लागलो.जीप खाली थांबलेलीच होती.पुण्याच्या मंडळीना राजूर ला सोडून आम्ही पुढे निघालो.तब्येत अचानकच खालावली.उलट्या,जुलाबामुळे अशक्तपणा जाणवत होता.मी मुंबईलाच जाण्याचा निर्णय घेतला.कसाराला ६.१५ ची लोकल पकडून कसातरी विराजच्या  घरी ८.०० वाजता पोचलो.

     पण अनुभव खूप जबरदस्त होता.स्वप्न पूर्ण झाले.सक्तीची विश्रांती मिळाली.सकारात्मक गोष्टी मनात साठवून ,पुढच्या ट्रेकचे नियोजन  करून दोन दिवसांनी मुंबईला अलविदा केला.....  

Sunday, February 21, 2016

लिंगाणा-बेलाग सुळका.....


                           लिंगाणा—बेलाग सुळका

     शब्द उच्चारला तरी अंगावर काटा येतो आणि समोर उभा राहतो अजस्त्र ,बेलाग सुळका....प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न,लिंगाणा सर करणे.मी तयारी सुरु केली.महिनाभर आधीच नाव देऊन ठेवले.३१ जानेवारी २०१६....उत्सुकता शिगेला पोचली होती.२९ तारखेला कोपरगाव वरून निघालो.आत्याकडे थांबून सकाळी १०.०० वाजता चिंचवड वरून प्रवासाला सुरुवात झाली.वेल्हा मार्गे पाबे खिंड उतरलो.तोरणा,राजगडाचे दर्शन झाले.जोडगोळीला पाहून प्रसन्न वाटलं.काही वेळातच वेल्ह्यात पोहचून जेवण केले ,आत्याने दिलेलं श्रीखंड जास्तच गोड लागत होतं.

    तोरण्याची भव्यता जाणवत होती.भट्टी वरून पुढे निघालो,धरणाचे काम चालू होतं.रस्ता तसा नीट नव्हताच.काही वेळातच मोरी गावी पोचलो.१०-१२ उंबऱ्याचं गाव.रस्ता खराब असला तरी ड्रायवर काका मस्त होते,त्यामुळे जाणवलं नाही.गावात पोचल्यावर पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.परत ती संधी उद्या मिळणार होती.सर्वाना प्रत्येकी हेल्मेट,डीसेंडर,रोप,हार्नेस दिले गेले,जे लिंगाण्यासाठी अत्यावश्यक आहे.सर्वानी सोबत रायलिंग पठाराकडे प्रस्थान केलं.ब्रह्मानंद-जे सुंदर वक्ते जाणवले,बिएसेनेल मधील जोडगोळी,डॉक्टरांची जोडी.मस्त गट्टी जमली.रायलिंग वरून लिंगाणा पाहताना मनात शेकडो विचार तरळून गेले.

   सुर्यास्त...काय देखावा होता.समोर लिंगाणा,त्यामागे रायगड.जगदीश्वराच्या मंदिरामागे सूर्य मावळत होता.मन शांत झालं.असं सुख कुठेही मिळणार नाही.ती दृश्ये मनात साठवतच camping site वर परतलो.तंबू आमच्याच प्रतीक्षेत होते.अंधार पडत असतानाच प्रसादने(ट्रेक लीडर) उद्याच्या सूचना दिल्या.खिचडी,कोशिंबीर तयार झाली होती.ब्रह्मानंदचे बौद्धिक झाले,श्री च्या कवितांचे वाचनही त्याने केले. ३.०० वा उठायचे असल्याने लगेच झोपून गेलो.

   पहाटे आपोआप जाग आली.चंद्राच्या शीतल प्रकाशात, ओंकारच्या शब्दात सांगायचं झालं तर “वाघ मारून “आलो. दोन घास पोटात ढकलून,बोराटयाची नाळ उतरायला सुरुवात केली.प्रसाद नवीन नवीन माहिती देत होता..सांधणची आठवण येत होती.काही ठिकाणी anchor चा वापर अत्यावश्यक होता.काही वेळातच पायथ्याशी पोचलो.टीम ची दोर लावायची धावपळ चालू झाली.पहिलाच टप्पा overhang होता.महत्प्रयासाने सर्वजण पाण्याच्या टाक्यापर्यंत आलो.आत्ता लक्षात येत होते ,गडाचा वापर तुरुंग म्हणून का केला जात असावा.टाक्यातील पाणी भरून घेतले आणि परत चढाईला सुरुवात केली.९.१५ पर्यंत माथा गाठला.समोर दिसत होतं महाराजांचा आवडता रायगड आणि आजूबाजूचा विहंगम परिसर.  

  रांगड्या सह्याद्रीचे वर्णन काय करावे!!!त्या सरळसोट पर्वतांच्या सोंडी,त्यात मुंगीसारखी दिसणारी गावं.बोराटयाची ,सिंगापूर ची नाळ.छानसं photosession करून उतरण्यास सुरुवात केली.आता खरा कस लागणार होता.rappling चा जुजबी अनुभव पाठीशी होता.यावेळी ५ मोठे टप्पे पार करायचे होते.४०,१८० फुटाचे टप्पे पार करू गुहेजवळ थोडी विश्रांती घेतली.थोडी झोप काढली आणि काही वेळातच पुन्हा उतरण्यास सुरुवात केली.एकावेळी एक जण उतरत असल्याने वेळ लागत होता.धाकधुक वाढत होती.दोन्ही बाजूला पूर्ण दारी होती.१००,१०० आणि ३०० फुटाचे टप्पे एकामागून एक rapple  करून पायथ्याशी आलो.माती बऱ्याच ठिकाणी ठिसूळ झाली होती.हेल्मेटची उपयुक्तता जाणवत होती.दगडांचा काही ठिकाणी पाऊसपण पडला.शेवटचा टप्पा जेव्हा पार केला आणि वर नजर टाकली ,काळजाचा ठोकाच चुकला.अंधारात चढाई सुरु केल्याने जाणवलं नाही,नाहीतर आमच्यातले निम्मे इथूनच परतले असते.खाली बसून वरून येणार्याना सूचना देण्यास सुरुवात केली.सगळे उतरल्यावर नाळ चढायला लागलो.रोप नेण्यासाठी गावातीलच एक काका आणि ताई आल्या होत्या.३ रोप चं वजन ते सहज उचलत होते,पायात paragon होती.त्या प्रसंगाने आमच्या डोळ्यात अंजन घातलं.आपल्या सुखवस्तू आयुष्याची कीव करावीशी वाटली.

    काही वेळातच मोरी गावात दाखल झालो.नाचणीची भाकरी,झणझणीत भाजीचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.ट्रेकचा शीण जाणवत होता पण सर्वात कठीण किल्ला सर् केल्याचा आनंद जास्त होता.पुन्हा एकदा मी,प्रथमेश सोबत एक सुंदर,खऱ्या अर्थाने कस पाहणारा ट्रेक पूर्ण केला.महाराजांना त्रिवार मुजरा करूनच अंथरुणावर पाठ टेकवली.

      प्रथमेश नान्नजकरसह श्रेयस पेठे reporting from LINGANA!!!!

Friday, February 19, 2016

सातमाळ रांगेतील ३ मणी..अचला,अहिवंत आणि मोहंदर..

       .
       नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा समस्या उभी होतीच.दिवाळीत गाडीवरून पडलो होतो आणि अजून नीट बरा झालोच नव्हतो.पण मनाशी पक्कं केलं आणि नाशिकला निघालो.शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास द्वारका circle ला पोचलो.ट्रेकक्षीतीझची team डोंबिवली वरून २.३० वाजता मला भेटली,पुण्यातून प्रथमेश पण आला होताच आणि द्वाराकेतूनच श्रीकृष्णदादाला घेतला.अशाप्रकारे सातमाळ च्या दिशेने प्रवास चालू झाला.
       Sack, sleeping bag, pittu bag ,track pant सगळ्याचे एकदमच उद्घाटन केले होते.पहाटे ५.३० पर्यंत पिंप्री वाडा मध्ये दाखल झालो.आवरून,नाश्ता करून ओळख परेड झाली आणि ७.१५ वाजता अचला चढण्यास सुरुवात केली.सुरुवातीची वहिवाट द्राक्षाच्या बागेतून,वन विभागाने लावलेल्या जंगलातून जात होती.पुढचा टप्पा जरा कठीणच गेला..वाटेचा अंदाज आला नाही,रस्ता थोडासा चुकला.सर्वेश आणि सुनीलने याआधी हा किल्ला केला होता पण तेही थोडे गोंधळले.पण सरतेशेवटी पायऱ्या दृष्टीक्षेपात आल्या आणि हायसं वाटलं.
       किल्ल्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण पाण्याचे टाके आढळले.स्थानिक लोक आजार बरा झाल्यावर त्या टाक्यात अंघोळ करून नवीन कपडे घालून गड उतरतात.त्यामुळे टाक्याजवळ जुन्या कपड्यांचा ढीग पडला होता.अजून काही टाकी होती,त्यांची रचना सुद्धा सुंदर आहे.overflow system प्रमाणे एकाखाली एक अशी त्यांची बांधणी आहे.तसे बाकी काही अवशेष गडावर दिसून येत नाहीत.गडाचा वापर टेहेळणी साठीच केला जात असावा.पायऱ्यांच्या वर एक खोदलेले खिडकीवजा भुयार आहे,तेसुद्धा पाहण्यासारखं आहे.त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे.
      अचला उतरून दगड पिंप्री मध्ये आलो.सुतार पक्षाचे दर्शन झाले.लगेच तिथून अहिवंतच्या दिशेने निघालो.गावातून बाहेर पडताना ५ वीरगळी मांडून ठेवल्या आहेत,त्या छान आहेत.सगळ्यांना डुलका लागला आणि इतक्यात दरेगावला पोचलो सुद्धा.उन्हाचा कडक जाणवत होता.pittu bag मध्ये जेवणाचे डबे,पाणी घेतलं आणि चढाई चालू केली...,किल्ले अहिवंत.
      सरळ उभी चढण होती,सोबत वाटाड्या होताच.काही वेळातच खिंडीत पोचलो.तिथून दिसणारा नजारा औरच होता.सप्तशृंगी चा खडा पहाड,मार्तंडया,रावळया-जावळया मागे धोडप. सुंदर .तिथेच बसून जेवण केलं.डूब्यावर पाच पाण्याची टाकी आणि तटबंदीचे काही अवशेष महेंद्र दादा ने MAP केले.किल्ल्यावर जुन्या वस्तूंचे अवशेष बरेच पडले होते.अहिवंत चा पसारा प्रचंड आहे.पाण्याची टाकी,मोठा तलाव,छोटेसे मंदिर पाहायला मिळाले.गडाच्या पश्चिम बाजूला एक मोठी गुहा आहे,ती पाहून तिथेच अमित दादा ने गडाचा इतिहास सांगितला.मुंगळयाचे महाभारत खूप दिवसांनी ऐकले.महेंद्र दादा सोबत नंतर उंच टेकडीवर जाऊन mapping  करून आलो,तिथे दोन राजवाड्यांचे आणि एक पाण्याचे टाके (बुजलेले) याचे अवशेष पाहायला मिळाले.
      शेवटी राजमार्गाने गड उतरताना अहिवंत ची भव्यता जाणवत होती.ट्रेक लीडर निमिशा मुळे वेळेत खाली उतरलो.सोबत विशाल आणि तानाजी हि शाळकरी मुले होतीच,त्यांची मदत झालीच.सगळे प्रचंड पायपीट केल्याने कंटाळले होते,चहा झाला.महेंद्र दादा सोबत त्याचे दुर्गभ्रमंती हे पुस्तक,तसेच त्याचे अनुभव यावर चर्चा झाली,खूप नवीन गोष्टी समोर आल्या.जेवणातील लीना ताईने आणलेल्या गाजर हलव्याने मजा आली.त्यामुळेच सगळे न घोरता झोपू शकले!!!!
    रविवारी,२९ तारखेला सकाळी ५.३० वाजताच WAKE UP CALL मिळाला.रात्री छान पैकी पाऊस झाला होता..प्रथमेश ने रात्री कधी सगळ्याचे बूट आत आणून ठेवले समजलेच नाही.मंदिर बंदिस्त असल्याने पावसाचा त्रास झाला नाही.नाश्ता करून किल्ले मोहंदर कडे प्रस्थान केले.
     किल्ल्याचे वैशिट्य म्हणजे त्याचे नेढे.तिथे मधमाश्यांची पोळी होती,खबरदारी म्हणून आम्ही सगळे अंग झाकून घेतलं.आमच्यासोबत मयुरेश जोशी येणार होते.त्यांनी नेढ्याची दंतकथा सांगितली.नेढे म्हणजे डोंगराला पडलेले सुईसारखे भोक.देवीने दैत्याला मारले आणि त्याचा प्राण इतका जोराने बाहेर पडला कि डोंगराला छिद्र पडले.असो.
     नेढ्यापर्यंतचा मार्ग घसरडाच होता.ROPE लावून नेढे CLIMB केले.दुसऱ्या एका ग्रुप ची पण मदत झाली.काही जणांना अवघड गेलं पण होईल सवय त्यानाही.पलिकडे गेल्यावर खूप मस्त वाटत होतं..असा अनुभव प्रथमच घेतला.समोर अबोना गाव आणि चणकापूर धरण अप्रतिम दिसत होतं.डोंगराच्या कडेच्या रस्त्याने गडावर पोचलो.पाण्याची टाकी,वरून दिसणारा सह्याद्री,कण्हेर गड पाहून मोहंदर उतरण्यास सुरुवात केली.
     परंतु वाट चुकीची निवडल्याने उतरण्यास कठीण गेले.वाटाड्या घ्यायला हवा होतं असा वाटलं.अवघड वाट होती,पण अशातूनच माणूस शिकतो,अनुभवी बनतो.चुका सुधारतो.लीडर ने ग्रुप छान सांभाळला.खाली आल्यावर मन आनंदानं भरून गेलं होतं.वेगळा ट्रेक केल्याचं समाधान मिळालं होतं.FEEDBACK मधून बऱ्याच गोष्टी समोर आल्या.साठ वर्षाचे तरुण सुनील काका,त्यांनी तर कमाल केली.बोलताना सुद्धा सांगितलेले काही मुद्दे मनाला भिडले.महाराजांनी जे उभं केलंय,ते पहा तरी.चालते व्हा,ट्रेक करत राहा.
     सातमाळेतील तीन मणी पहिले.अहिवंत खूप आवडला.पंकज घारे सारखा लेखक भेटला,अबोनातील मित्राची ओळख झाली.अनेक नवीन सवंगडी मिळाले.दालतडका आणि ताकावर ताव मारून परतीचा प्रवास सुरु केला तो राहिलेल्या माळेकडे पहातच..रावळया,जावळया,मार्तंडया आणि वणी!!!!.














स्वराज्याचा मानबिंदू रायगड --आनंदजी देशपांडे यांच्यासोबत

        जे व्हायचं असतं ते कोणत्याही मार्गाने घडून येतंच..नऊ वाजता मनात आलं काय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रायगडावर पोचलो काय,अगदी सगळंच अविस्मरणीय..
       ठरलं जायचं रायगडला ,बस मिळाली,२.३० वाजता रात्री पुण्यात.तीन वाजता रायगडकडे वरंधा मार्गे.खूप खराब रस्ता,पण जाणवतंच नव्हतं,फक्त रायगड दिसत होता.रोप-वे च्या इथे अमित दादा भेटला,मस्त वाटलं.
       काही वेळातच राहायच्या ठिकाणी bags ठेऊन  MTDC canteen जवळ एकत्र आलो.आनंदजी देशपांडे यांची ओळख झाली.ट्रेक प्रमुख शुभदा चे आभार मानले.इथून पुढील सुंदर अनुभव सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.
       सुरुवात मेणा दरवाजा पासून झाली.पुढे असलेल्या राण्यांच्या महालाची बांधणी,पालखी दरवाजा,त्यांचं वास्तुशास्त्र,महालांचे उन,पाऊस,वारा   यांपासून संरक्षण करण्याचे उपाय,शौचालायांची रचना,महाराजांची स्वच्छ्तेबाबतची भूमिका यांची कल्पना आली.
      पालखी दरवाजातून बाहेर पडल्यावर दिसतात ते म्हणजे रायगडचे सौंदर्य असणारे स्तंभ.त्यांची रचना,त्यावरील कोरीवकाम,त्याचे राणीच्या महालाशेजारील स्थान,गंगासागर तलाव,त्याच्या बांधणीतील कौशल्य,राजांनी व हिरोजींनी पाण्याचे १०००० लोकवास्तीसाठी केलेले नियोजन पाहून थक्क झालो.नंतर पुढे पिण्याच्या पाण्याचा आजचा मुख्य स्रोत म्हणजेच हनुमान टाके नजरेस पडते.दारू कोठाराबाबत नवीन माहिती समजली.तोफ डागण्याची पद्धत,कोठाराची निगा कशी राखली जायची,तोफेच्या शेजारील पाण्याच्या हौदाची रचना हे ऐकता ऐकता कधी युद्धभूमीवर पोचलो समजलेच नाही.
       पुढचा महत्वाचा टप्पा ,रायगडचे आकर्षण म्हणजेच टकमक टोक पाहून मनात धडकीच भरली.पुढे बाजारपेठ पाहता पाहता खूप वस्तू खरेदी केल्याचा भास होत होता.तिथून राजादर्बाराच्या दिशेने प्रस्थान केले.नगारखान्यातून आत प्रवेश करते झालो आणि तिथेच शेजारी त्या मोठया शिळेजवळ ठाण मांडून बसलो,एका अदभूत प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी.आनंदजीच्या तोंडून इतिहास ऐकताना ६ जुन १६७४ ला कधी पोचलो कुणास ठाऊक.राज्याभिषेक झाला.दरबार पुन्हा मांगल्याने भरून गेला.शेवट झाला तो साश्रूनयनानीच.
       सदर,मेघडंबरी,अष्टप्रधानांची कामकाजाची जागा पहिली.त्यानंतर पोचलो ते आपल्या मंदिरात ,महाराजांच्या निवासाच्या ठिकाणी.त्याशेजारील टांकसाळ,न्हाणीघरातील filtration ची पद्धत,अष्टप्रधानांचे राजवाडे,धान्य कोठार पहिले.जाताना मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि पिठ्ल्यावर ताव मारला आणि विश्रांती साठी निघालो.
     दुपारच्या संस्कारवर्गाचा प्रारंभच छत्रपतींच्या समाधी पासून झाला.दर्शन घेतल,हलकेच पावसाला सुरुवात झाली होती.जगदीश्वराच्या मंदिरात विसावलो.आता खरा जलाभिषेक चालू झाला होता रायगडला.         
      गो.नि.दांच्या पुस्तकातील खिळवून ठेवणारे उतारे,कडाडणाऱ्या वीजा,हिरोजींची स्वराज्यनिष्ठा,जिजाउंचे आणि महाराजांचे हळुवार नातं याने जगदिश्वराचा गाभारा भरून गेला.धाडसी माणसांच्या मागे तो नेहमी असतोच.याचा प्रत्यय आला.आम्ही बाहेर पडताच पावसाचा जोर ओसरला.सरांचे एक वाक्य हृदयावर कोरलं गेलं, “अरे,देव नाहीच.यावर तरी पूर्ण विश्वास ठेवा”.
     जेवणापूर्वी थोडा वेळ मिळाला त्यात मग सरांकडून खुप गोष्टी समजल्या.आमच्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक नाजूक विषयांना सरांनी स्पर्श केला.इतिहासाचे भविष्य ,एखाद्या गोष्टीमागील intention वरून त्याला काय म्हणायचं हे ठरवावं,इतिहासाचे मानवी जीवनाशी नाते समजावून सांगितलं.MTDC मध्ये जेवण करून आल्यावर सरांशी सोलापूर बद्दल थोड्या गप्पा झाल्या,झोप कधी लागली समजलच नाही.       
    रविवारी wake up call देण्याआधीच जाग आली.आवरून,पोह्याचा double नाश्ता करून समोर दिसणाऱ्या श्रुष्टीसौंदर्याचे फोटो काढले आणि थेट कुशावर्त गाठले.वाडेश्वराचे दर्शन घेतले.आनंदजींनी इथे ठरवून एका विषयाला हात घातला,नवीन पिढीची इतिहासाबाबतची जाणीव,संवेदना. कुठली पुस्तके वाचावीत,बाबासाहेबांचे योगदान,किल्लेबांधणी चे तंत्र यावर चर्चा झाली.आम्हीपण त्यांना निरोप देताना भावूक झालो.पेशाने वकील असूनही त्यांची इतिहासाबाबतची तळमळ जाणवत होती.सोलापूर करांबाबत काही गोष्टी मनाला टोचल्या,पण सुधारणा हाच जीवनाचा मूलमंत्र आहे हेपण लक्षात आल.
        त्याच वाटेने खाली उतरून गेल्यावर वाघ दरवाजा पहिला.राजाराम महाराज,ताराराणी साहेबाना पाळणा करून येथूनच बाहेर काढले गेले होते.परत फिरून,आवरून गड उतरण्यास प्रारंभ केला.
       दोन दिवसात रायगड पाहणं म्हणजे अशक्यच.पण अनुभवाची शिदोरी पूर्ण भरून गेली होती.इतिहासाचे अनेक नवीन पैलू समोर आले. Knowledge आणि information यातील दरी जाणवली .पाचाडला देशमुखांकडे जेवण केले.trekshitiz ने मला आणि प्रथमेश ला राजमुद्रेची प्रतिमा भेट दिली.सर्वांचा निरोप घेऊन पुण्याकडे गाडी दामटली.
      अष्टविनायक जेंव्हा गाडीवरून केले तेंव्हा वाटलं होतं कि पावसाळ्यात ताम्हिणी तून जायलाच हवं.महाराजांनी इच्छा पूर्ण केली,पण.इतका प्रचंड पाऊस कधीच पहिला नव्हता.तीन फुटांवर समोर दिसत नव्हतं,वीज दोन वेळा शेजारी पडल्यासारखी वाटली.पण शेवटी “त्याची” साथ होतीच,पुण्यात सुखरूप पोचलो.
  AgaiN THANK YOU TREK KHITIZ AND ANANDAJI!!!!!!
LAST BUT NOT THE LEAST PRATHMESH NANNAJKAR,MY TREKKING FRIEND.
             

.                                                                                       

ढाकचा बहिरी with TREKSHITIZ

           Valentine Day Special Trek म्हणून १४ फेब्रुवारीचा ढाक बहिरीची बुकिंग करायची होती पण जागा full झाल्यामुळे अमित दादा कडून jack लाऊन जागा पटकावल्या.नंतर काही members कमी झाल्यामुळे बसमध्ये जागा मिळेल असं संजय काकांनी सांगितलं.खूप हायसं वाटलं.
      शनिवारी सकाळी कोपरगाव वरून निघालो,दुपारी प्रथमेशकडे थांबून ७.०० च्या लोकलने महेंद्रशी बोलणं झाल्याप्रमाणे निघालो.लोणावळयाला महेंद्र आणि आरती भेटले.लगेच अहमदाबाद ट्रेनने कर्जत गाठले.पण मुंबईकरांच्या 'वक्तशीरपणा'मुळे तीन तास स्टेशनवरच काढावे लागले.रात्री एकच्या सुमारास आम्ही सांडशीकडे निघालो. काही वेळातच तिथे पोहचून पथाऱ्या पसरल्या आणि घोरायला सुरुवात केली.सकाळी ५.३० वाजता wake up call मिळाला.आन्हिकं आटोपून चहा,नाश्ता उरकला.कळकरायाचा सुळका वाट  पाहत होता..मोशे,सचिन,प्रणोती,अमृता,चिन्मय,गंगापुरकर काका बऱ्याच दिवसांनी भेटले.सुरुवातीलाच ओळख परेड झाली आणि ढाकच्या दिशेने प्रयाण केलं.
        संजय काकांच्या सूचनेनुसार थोड्या थोड्या वेळाने पाणी पोटात टाकत होतो.चाल आणि चढण असल्यामुळे दम लागत होता.मांजरसुंभा उजव्या बाजूला साथीस होताच.काही वेळातच बहिरीनाथाच्या गुहेचे दर्शन झाले.खूप जबरदस्त असणार ट्रेक बघूनच जाणवलं.गर्द वनाचा टप्पा पार करून पायथ्याला पोचलो.वाटेत एका ठिकाणी दीपमाळ व पिंड दृशीस पडते.camping साठी ती जागा योग्य वाटली पण पाण्याची व्यवस्था करावी लागेल.पायथ्यापासून कठीणता जाणवू लागली.देवस्थान असल्याने मार्ग अस्वच्छ बनला होता.दगड ठिसूळ झाले होते.उन्हाचा कडाका जाणवत होता.जाण्या-येण्याचा रस्ता एकच असल्याने traffic jam झालं होतं.दुसऱ्या एका group च्या समन्वयाने आम्ही दोर लावला आणि एक एक करून वर जायला लागलो.काका,विराज,लादेनचं मार्गदर्शन होतंच.मोशेपण धीर देत होता.Alternately,उतरणे आणि चढणे अशाप्रकारे आम्ही सर्व वर-गुहेत पोहोचलो.शेवटचा टप्पा कठीणच होता.परंतु लिंगाणा केल्याने भीती कमी झाली होती.
         गुहेत बहिरीनाथांच्या मूर्ती,पाण्याचे कुंड दुसऱ्या गुहेत स्वयंपाकाची भांडी,स्वतंत्र स्वयंपाकाची जागा आहे.बऱ्याच ग्रामस्थांचे हे कुलदैवत असल्याने माणसांचा रविवारी राबता असतो.कामशेतच्या बाजूने सव्यसाची येऊन मिळाला.विश्रांती घेऊन,photos काढून झाल्यावर उतरण्यास सुरुवात केली.आरती,मनीषा यांचा धीरच होत नव्हता.सगळ्यांनी confidence  देऊन,समजावून त्यांना खाली उतरवले.तसा अवघड नव्हता टप्पा पण मनात भीती बसली होती.काही वेळातच सगळे खाली उतरले आणि पायथ्याशी असल्याने 'त्या' मोकळ्या जागेत येऊन डबे सोडले.
    प्रथमेशला थोडा पित्ताचा त्रास सुरु झाला होता..जेवण झाल्यावरच एक गोष्ट लक्षात आली,आपण गुहेतून पाणी भरायचं विसरलोय.आम्ही आमच्या bags खालीच ठेवल्याने पाणी भरायचं राहूनच गेलं.शेवटच्या काही बाटल्या शिल्लक होत्या.चारच्या सुमारास पुढे चालायला सुरुवात केली.सोबत एक कुत्रं सकाळपासून साथीला होतंच.त्याला दिलेला भात त्याने कल्पकतेने एका ठिकाणी झाकून ठेवला.खूप आश्चर्य वाटलं.परतीच्या प्रवासात पुढे मोशे,मध्ये काका व अमृता आणि मागे लादेन (सचिन लादे) होता .ऊन वाढल्यामुळे त्रास जाणवू लागला.एका ठिकाणी रस्ता काहीसा चकवा देऊन गेला.रस्ता घसरडा असल्यामुळे उतरायला वेळ लागत होता.साडेसहाच्या सुमारास उताराला लागलो.पाण्याने सर्वाचाच दम काढला.काहीशा दूरवरच्या अंतराने सांडशीमध्ये पोचलो.मस्तपैकी वडापाव हाणला.
      ट्रेकने खरच एक नवी दृष्टी दिली.खूप गोष्टी शिकवल्या.उन्हाळ्यात ट्रेक करताना तीन-चार लिटर पाणी सोबत हवंच.सगळेच दामले होते.आम्हाला कर्जत ला लवकर पोचायचे होते.चहा घेतला,पाणी भरून घेतलं.FEEDBACK SESSION मध्ये खूप गोष्टी समोर आल्या.उतरताना बरीच चाल झाल्यावर गावाजवळ एका वीटभट्टीवर पाणी प्यायलो ,त्या वेळच्या भावना शब्दात सांगणं कठीण आहेत.काकांच्या नियोजनामुळे ट्रेक सुंदर झाला.पुन्हा एकदा खूप छान छान,नवीन ओळखी झाल्या.मी आणि प्रथमेश ११.१५ पर्यंत शिवाजीनगर ला आलो.मला १२.०० ची शिर्डी गाडी मिळाली.५.१५ ला घरी पोचलो.९.०० वाजता परत कामावर रुजू.

   ढाक च्या बहिरीचे दर्शन मनाला सुखावून गेले.पावसाळ्यात हा ट्रेक करेनच सोबत कळकरायाचा सुळकापण वाट पाहतोय.