Thursday, May 25, 2017

अनेक सत्ताधीशांना साथ देणारा सोलापूरचा भुईकोट

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश (तेलंगणा) या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले एक मिश्रभाषिक गाव म्हणजे सोलापूर. याच सोलापुरात एक अप्रतिम कलाकुसरीने नटलेला भुईकोट आहे. सोलापूरचा भुईकोट बहामनी राज्याचा प्रधान महमूद गवान याने साम्राज्य विस्तारासाठी हा किल्ला बांधला.
36 Photos available for this fort
 

सध्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या किल्ल्यात पश्चिमाभिमुख प्रवेशद्वाराने आपण प्रवेश करतो, ती किल्ल्याची तटबंदी तोडून केलेली व्यवस्था आहे. मुख्य प्रवेशद्वार हे सध्याच्या सावरकर मैदानाच्या बाजूने आहे. किल्ल्यात मुख्य दरवाजाने प्रवेश करताना जुनी मोठी जाड साखळी आणि वीरगळ आपले स्वागत करतात. किल्ल्याला तीन बाजूनी खंदकाने वेढलेले आहे. चौथ्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आणि तलाव आहे. त्याच खंदकावर बांधलेल्या आधुनिक पुलावरून आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी पूल पार केल्यावर डाव्या बाजूला झाडाझुडपांत लपलेली नागबावडी आहे.

किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे हत्ती दरवाजा किंवा बाबा कादर दरवाजा हा गोमुखी बांधणीचा दरवाजा आजही सुस्थितीत आहे. लाकडी दरवाजावरील लोखंडी अणुकुचीदार खिळे, लोखंडी जाड पट्ट्या अजूनही शाबूत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवाज्यावर तीन झरोक्यांची रचना केलेली आहे. दरवाजाच्या वर नगारखाना बांधलेला आहे. नगारखान्याच्या खालून किल्ल्यात प्रवेश केल्यावर पहारेकऱ्यांच्या खोल्या नजरेस पडतात. त्याच्या समोर घोड्याच्या पागा दिसतात. पहिल्या दरवाजाच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दोन्ही दरवाज्यांमध्ये युध्द मैदानासारखी मोठी जागा आहे. शत्रू आत आल्यास त्याला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी या जागेचा उपयोग होतो. दुसरा दरवाजा हा शहर दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या वरील दोन्ही खिडक्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाज्याच्या मधोमध कमानीच्या वर एक पर्शियन शिलालेख व त्याच्या बाजूला दोन शरभ शिल्प कोरलेली आहेत. या शिलालेखात विजापूरचा आदिलशाह, राजा सुलतान मोहम्मद, त्यांचे अधिकारी यांचा उल्लेख आढळतो. दरवाजा वरील खिडक्यांमधे शरभ आणि मृग शिल्प बसवलेले आहे. दुसऱ्या दरवाज्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर अस्पष्ट असा देवनागरी लिपिमधील शिलालेख नजरेस पडतो. या दरवाज्याच्या आतील बाजूसही पहारेकऱ्यांच्या खोल्या दिसतात.

किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराशी लागूनच महाकाळ नावाने ओळखला जाणारा बुरुज आहे. बुरुजाच्या बांधकामाच्या वेळी हा बुरुज सतत ढासळत असल्याने बुरुज बांधताना मुंजा मुलाचा बळी देण्यात आला असे सांगतात. तसेच त्या मुंजा मुलाच्या घराण्याला (जोशी घराणे) तत्कालीन शासनाने १५ रु. वर्षासन चालू केले. बुरुजामध्येच मुंजोबाचे (महाकालेश्वर) आणि शनीश्वर मंदिर आहे. येथे महाकालेश्वराचा उत्सव जोशी कुटुंबीय चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि नृसिंह जयंतीला साजरा करतात. मंदिराच्या शेजारी एक गजशिल्प (एक दुसरे असेच शिल्प हुतात्मा बागेत घसरगुंडीच्या बाजूला आहे) आणि व्दारपालाचे शिल्प ठेवलेले आहे. याच प्रवेशद्वाराच्या वर फारसी लिपीतील (हिजरी ९८६; इ.स.१५७८-७९) शिलालेख आहे. या लेखात राजा अली आदिलशाह पहिला व त्याचा अधिकारी जाबीद खान याने मशीद, बाजारपेठ, बाग, हौद निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात सोलापूरचा उल्लेख संदलपूर असा आलेला आहे.
तिसऱ्या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या खोलीमध्ये एक वीरगळ आहे. वीरगळीच्या बाजूस शिलालेख आहे. त्यात किल्ल्यातील विहिरीचा निर्मितीचा उल्लेख केलेला आहे. या दरवाजाच्या वरच्या बाजूस वीटांनी बांधलेली वास्तू आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूला उत्खननात सापडलेले श्री. कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर पाहावयास मिळते. १४ कोरीव खांब, बाह्य भिंतीवर व्यालशिल्पे, नागशिल्पे, विविध फुलांची शिल्पे तसेच कामशिल्पे असलेले हे मल्लिकार्जुन मंदिर आहे.


१८१९ साली उत्खननानंतर या मंदिराचे काही खांब वापरून शहराच्या बाळीवेस परिसरामध्ये नवीन मल्लिकार्जुन मंदिर बांधण्यात आले. किल्ल्यातले मंदिर श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी बांधल्याचा उल्लेख कवि राघवांक यांनी केलेला आहे. या मंदिराला देवगिरीचे यादव, कदंबराजे, व इतर सावकार यांचेकडून वतने, इनामे मिळाल्याचे उल्लेख आहेत. या मंदिराच्या उत्खननात सापडलेले दोन कन्नड शिलालेख व मोठे व्दारपाल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयात ठेवण्यात आलेले आहेत आणि देवीची मूर्ती चंदीगडच्या वस्तुसंग्रहालयात आहे.
मंदिराच्या डावीकडे काही अंतरावर एक वास्तू आहे. तिला ३२ खांब असल्याने ३२ खांबी मस्जिद म्हणले जाते. येथील कोरीव खांब, नक्षीयुक्त सजावटीने नटलेले आहेत. वास्तुमध्ये आत समोरून थंड हवा येण्यासाठी एक फट ठेवलेली पहावयास मिळते. वास्तूच्या आणि मंदिराच्या तिरक्या दिशेला किल्ल्यातील चौकोनी आकाराचा उंच बुरुज उठून दिसतो. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असून तोफ ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते. शेजारीच चौकोनी दोनही बाजूस पायऱ्या असलेली गोड्या पाण्याची विहीर आहे. परंतु झाडी वाढल्याने ती लवकर निदर्शनास येत नाही.
चौकोनी बुरुजाच्या दिशेने उजवीकडे बुरुजावरून चालत गेल्यास बुरुजावरच एक मोडी लिपीतील शिलालेख दिसतो. इ. स. १६८० चा काळ दर्शविणारा हा शिलालेख इकडील तटबंदी कच्ची होती, ती पक्की बांधून काढल्याचे सांगतो. इथूनच पुढे दर्गोपाटील बुरुज आहे. महाकालेश्वर बुरुजाप्रमाणे इथे दर्गोपाटील घराण्यातील बाळंतीणीला आत्मसमर्पण करावे लागले, तेव्हा हा बुरुज बांधून पूर्ण झाला. इथेही गुढी पाडव्याला उत्सव साजरा होतो. बुरुजावारच पद्मावती देवीचे मंदिर आहे.

दर्गोपाटील बुरुजाच्या (पद्मावती) पुढेच बाळंतीण विहीर दिसते. ही विहीर लांबट आयाताकर असून त्याच्या कडेला एक हवेशीर सज्जा आहे, आणि तिथूनच खाली उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. बाळंतीण विहिरीकडे जाताना बुरुजाच्या वरील बाजूस एक फारसी लिपीतील शिलालेख दिसतो. यामध्ये सुलातानासाठी सुखकारक, नयनरम्य महाल बांधल्याचा उल्लेख आहे.
बुरुजावरून सरळ चालत गेल्यावर एक हवेशीर बाल्कनी असलेला चौक लागतो. याच बाल्कनीच्या एका स्तंभावर देवनागरी लिपीतील शके १४६६ (इ. स . १५४४) च्या काळातील शिलालेख आहे. हा बुरुज बांधण्यासाठी दोन महिने लागले असा स्पष्ट उल्लेख यात आढळतो.


इथूनच पुढे निशाण बुरुज (हनुमान बुरुज) हा टेहेळणीच्या दृष्टीने महत्वाचा किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज आहे. इथून सिद्धेश्वर मंदिराचा परिसर नजरेत सामावता येतो. बुरुजावर चढताना अनेक खंडीत शिल्पे पहावयास मिळतात.


या बुरुजावरून सरळ चालत आता जिथून प्रवेशद्वार आहे, तिथे पोहोचता येते. बुरुजावरून खाली उतरल्यावर ब्रिटीशकालीन वास्तू आहेत. तसेच शिखराचे भग्न अवशेष, स्तंभ मांडून ठेवलेले आहेत. आता जिथे उद्यान आहे त्याच्या मधोमध दोन ब्रिटिशांच्या मोहोर असलेल्या तोफा ठेवलेल्या आहेत. सध्याच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून डावीकडे आखाड्याच्या दिशेने आत गेल्यावर तटबंदीवर विविध प्रकारची शिल्पे पहावयास मिळतात. त्यात वीरगळ, विद्याधर पट, शिल्पपट आहेत असेच सरळ तटबंदीच्या कडेने चालत गेल्यास किल्ल्यातील एकमेव अशा अष्टकोनी बुरुजापाशी आपण येतो.
परत त्याच रस्त्याने मागे येऊन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण होते.



किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने ९ ते ५ अशी प्रवेशाची वेळ आहे. बाग मात्र ७ वाजेपर्यंत चालू असते. सोलापूर, नळादुर्ग, परांडा, माचणूर , करमाळा, मंगळवेढा हे भुईकोट दोन तीन दिवसात पाहाता येतात. 

Tuesday, May 23, 2017

सबकूछ प्लस (Valley)

आपल्या सभोवताली, जवळपास खूप आश्चर्यकारक गोष्टी निसर्गात सामावलेल्या असतात. अशीच एक सर्वार्थाने सुंदर गिर्यारोहणाचा अनुभव देणारी जागा म्हणजे ‘प्लस व्हॅली’.प्लस व्हॅली हा दोन दिवसाचा मुक्कामी ट्रेक म्हणूनच सहसा करतात. देवकुंड किंवा भिरा गावाच्या अलीकडे मुक्काम करता येतो. तसेच भिरा गावातून फक्त देवकुंड धबधबा एका दिवसात पाहून येता येईल. या भागात उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळ्यात हा ट्रेक करता येतो.
     पुण्यापासून कोकणात उतरणार्‍या  ताम्हिणी घाटात ताम्हिणी गावाच्या पुढे डोंगरवाडी जवळ घाटातच पर्यटकांसाठी एक चौथरा बांधलेला आहे. या चौथाऱ्यापासूनच आपण दरीत उतरायला सुरुवात करतो. या ठिकाणी दोन दऱ्या एकमेकांना छेदत गेल्या आहेत, अवकाशातून तसेच या घाटातूनही बघितले असता तो आकार ‘+’ या चिन्हासारखा दिसतो. म्हणून या दरीला नाव प्लस व्हॅली दिले गेले.
दरीत उतरण्यास सुरुवात केल्यावर ठिसूळ दगडांची मालिका लागते. उतरताना वाटेत दिसणार्‍या मोठया दगडांमुळे सांदण दरीची आठवण होते. उजवीकडे उंच कातळकडा ठेवत आपण पुढे मार्गक्रमण करतो. पट्टीच्या गिर्यारोहकांनी या कातळ कड्यावरही प्रस्तररोहणाचा सराव केलेला दिसून येतो. तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये आपण दरीत पोहोचतो. गर्द झाडीनी हा भाग नटलेला आहे. दगडांच्या कपाऱ्यांमधून वाहत आलेले पाणी बऱ्याच ठिकाणी आढळून येते. उन्हाळ्यातही या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असते. झाडीमधून उजवीकडे वळून आपण एका लहानशा डोहापाशी येतो. वाहते आणि स्वच्छ पाणी असल्याने पाण्याचा तळ स्पष्टपणे दिसतो. नितळ पाण्याने मन सुखावून जाते. येथे पाणपिशव्या, बाटल्या भरून घेऊन पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण चालू लागतो.
पाण्याच्या वाटेने न जाता डोहाच्या डावीकडून झाडीतून आपण एका कड्यावर पोहोचतो. इथून खाली १०० फुटांचा एक रॅप्लिंग चा टप्पा आहे. योग्य त्या साधनांसह व प्रशिक्षाकांसह हा टप्पा उतरणे आवश्यक आहे. ८० फुटांपर्यंत दगडाच्या मदतीने व शेवटच्या २० फुटांमध्ये ओव्हरहँग असल्याने दोराच्या व्यवस्थित हाताळणीने आपण पुन्हा पाण्याच्या प्रवाहात येतो. इथे दगडांच्या सावलीत तहानलाडू भूकलाडू पोटात ढकलावेत. पाण्याच्या वेगामुळे दगडालाही कसे आकार प्राप्त होतात हे येथे पाहता येते. येथे खाली उतरल्यावर आणखी एक पाण्याचा डोह नजरेस पडतो. या पाण्याच्या सान्निध्यामुळे हा टप्पा सुखावह वाटतो.
इथून पुढे असाच एक रॅप्लिंगचा पॅच आहे. या ठिकाणाहून खाली पहिले असता एक कुंड दिसते, हेच ते प्रसिद्ध देव कुंड. आता आपण ज्या मार्गाने उतरणार तो मार्ग जलप्रपाताचा आहे. व्यवस्थीत उपकरणे लावून उतरण्यास सुरुवात केल्यावर ४०-५० फुटांपर्यंत पायाला दगड लागतो, त्याच्या मदतीने आपण हळूहळू खाली उतरतो पण यापुढे दगडाने वक्राकार धारण केल्याने दोराच्या कौशल्यानेच आपण खाली सरकतो. जवळजवळ १२५-१५० फुटांचा हा पुढचा टप्पा आपल्याला सरळ देवकुंडामध्ये उतरवतो. रॅपल करत असतानाही पाण्याची संततधार आपल्या शिरावर अभिषेक करीत असते. हवेतून दिसणारे खालील दृश्य येथे येऊनच पाहण्यात मजा आहे.
कुंडाच्या आजूबाजूला पावसाळ्याव्यतिरिक्त मुक्काम करता येतो. दोन्ही बाजूनी अंगावर येणारे खोलगट कडे व मध्ये साठलेले पाणी.ज्यांना आवड आहे अशांना कुंडात  जलविहारही करता येईल.जर मुक्काम केला तर सकाळी लवकर उठून आवरून पुढे चालण्यास सुरुवात करावी. पाण्याच्या मधूनच प्रवाहमार्गातून चालत गेल्यास सप्तकुंडापाशी आपण येतो. येथेही मुक्काम करता येईल. आजूबाजूची किर्र झाडी चालताना सुखावून जाते. या सरळ वाटेने आपण १ ते १.३० तासात भिरा गावात पोहोचतो. रस्त्याने येताना आपण भिरा धरणाच्या बाजूनेच चालत असतो. उजवीकडे घनगड, कुंडलिका दरी लक्ष वेधून घेतात. भिरा गावात उतरल्याने आपण कोकणातील रायगड जिल्ह्यात प्रवेश करतो. म्हणजेच पुणे जिल्ह्यातून प्लस व्हॅली मार्गे आपण कोकणात उतरतो.
भिरा गावातून देवकुंड पर्यंतचा सोपा ट्रेक उन्हाळ्या पर्यंत करता येतो. रस्ता व्यवस्थित असल्याने वाटाड्याशिवाय सुद्धा देवकुंडापर्यंत पोहोचता येते.
मुंबईतून खोपोली, पाली मार्गे आणि पुण्यातून पौड मुळशीमार्गे ताम्हिणी घाटातील डोंगरवाडी जवळ पोहोचता येते. गरुडमाचीमुळे हा भाग प्रकाशझोतात आला आहे. आदरवाडी मध्ये राहण्याची व जेवण्याची सोय होऊ शकते. ट्रेक भिरा येथे संपतो. तेथुन बसने परत येता येते.
राहाण्याची सोय नाही. सोबत स्लिपिंग बॅग्ज, तंबू बाळगावेत.वरच्या टप्प्यात आदरवाडी येथे तर शेवटी भिरा गावात शेलारमामा यांचेकडे व्यवस्था होऊ शकते. परंतु मुक्काम करायचा असल्यास शिधा सोबत बाळगावा. उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध असते.
भिरा गावातून पाऊस कमी झाल्यावर करावा. प्लस व्हॅली पाणी ओसरल्यावर हिवाळ्यानंतर कधीही करता येईल.

Tuesday, April 25, 2017

राजगड ते तोरणा म्हणजेच RA-TO


            नवीन वेळापत्रक जेव्हा जाहीर झालं तेव्हाच लिडर कडे नाव दिले होते, अशा ट्रेक पैकी एक म्हणजे राजगड ते तोरणा. पण काहीतरी अडचण असतेच. याच तारखांच्या दरम्यान संघाचे शिबीर होते. त्या शिबिराची व्यवस्था आमच्या शाखेकडे होती. आठ तारखेला रात्री खेड शिवापुरला जाऊन व्यवस्थेत सहभाग देऊन आलो, आणि ९, १०, ११ डिसेंबरला ट्रेकला जायचं पक्कं केलं.
            त्यातपण मी आणि ओंकारने अर्धा दिवस सुट्टी काढून ९ ला रात्री राजगडला जायचा ठरवलं.  त्यातच  सुट्ट्यांचा प्रोब्लेम.  आमचा सगळा ग्रुप आधीच राजगडावर दाखल झाला होता. मी आणि ओंकार ९ तारखेस सहा वाजण्याच्या सुमारास माझ्या लाडक्या शाईन वरून निघालो गुंजवण्याकडे.  सर्कस करतच निघालो. समोर खांद्यावर माझी सॅक, मागे ओंकार आणि त्याची सॅक आणि मधे मी आणि (मी फूड टीम मध्ये असल्याने) मॅगी, दुध पावडर, चहा हे साहित्य भरलेली पिशवी.  मजा येणार होती. ओंकारने स्वारगेटला आल्या आल्या प्रश्न केला, “हेल्मेट?” मी मानेनेच नाही असे सांगितले.  या मुद्द्यावरून मला ट्रेकभर ओंकार, विराज आणि गायत्रीचे बोलणे ऐकावे लागले.
            गुगल मॅप पाहत, पेट्रोल भरत, थंडीपासून स्वतःला वाचवत, शेवटच्या एस्. टी. मागे, तिची टायर धूळ शरीरभर झेलत, आठ वाजण्याच्या सुमारास गुंजावण्यात रसाळ यांच्याकडे पोचलो. रात्रीचे जेवण त्यांच्याकडूनच घेणार होतो असे समजले, त्यामुळे ते वाहून नेणारे काका बराच वेळ आमच्यासाठी थांबले होते. आम्ही चहाचे दोन घोट पोटात ढकलतच त्यांच्या मागे चढायला सुरुवात केली. चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात, पोवाडे ऐकत दीड तासातच राजगड आम्ही चोर दरवाज्याने सर केला. शर्ट, थंडीचे जर्कीन घामेजले होते. ओंकारला थोडा पाठीचा त्रास जाणवत होता. चोर दरवाज्यात आल्यावर समोर चंद्रप्रकाशात डौलाने फडकणाऱ्या भगव्याकडे पाहिल्यावर सगळा शिणवटा दूर झाला.

पद्मावती टाकं 


            पद्मावती माचीवर, सईबाई राणीसाहेबांच्या समाधीसमोरच मंदिरात आमचा तळ पडला होता. सर्वजण भुकेलेले होते, शेकोटी घेत होते.  भेटाभेटी झाल्यावर सर्वानी भाकरी, उसळ, भात, वरण, ठेचा सोबत पेठे स्पेशल शेंगा चटणीवर आक्रमण करून उदाराग्नी शांत केला. जेवण झाल्यावर मस्तपैकी जागा शोधून जेव्हा त्या पद्मावती मातेसमोर देह टेकवला तेव्हा जगातील सर्व सुखं मिळाल्याचा प्रत्यय आला. 
या ट्रेकचा म्होरक्या सन्माननीय विराजशेठ टिल्लू यांच्या हकारण्याने ५.३० वाजताच जाग आली.  प्रातःविधी उरकल्यावर चहाची गडबड चालू झाली.  मंदिरात आमच्यासोबत अजून एक ग्रूप होता. तसेच गडावर  डागडुजी करणारे गडी पण होते.  उमेश, गायत्री यांनी रामदेव बाबांची चहा पावडर वापरून बक्कळ चहा केला.  आमचा नवीन सदस्य ‘छोटा विराज’ याच्या कृपेमुळे लाकडांची टंचाई जाणवली नाही.  मनसोक्त चहा घेऊन पाणपिशव्या भरून नाष्ट्याची वाट बघत होतो. परंतु तो तोरण्याच्या वाटेतच करणार आहोत असे समजले.  मग सोबत दुपारची शिदोरी, नाष्टा घेऊन संजीवनी माचीवरून तोरण्याकडे प्रस्थान केले.

संजीवनी माची 


माची अलीकडूनच ‘व्याघ्र मुखाच्या’ बाजूने माचीला वळसा घालून त्या सलग पसरलेल्या टेकड्यांवर उतरलो. समोर आपण कोणत्या वाटेने जाणार आहोत हे स्पष्ट दिसत होते. तोरण्याची बुधला माची खुणावत होती. हळूहळू राजगड उतरण्यास सुरुवात केली. टप्पा काहीजणांना जरा कठीण जात होता.  दगड, घसरडी वाट, त्यात वाढत जाणारे ऊन होतेच. दहा वाजण्याच्या सुमारास उपीटावर भूक भागवून लगेच पुढील प्रवास चालू ठेवला. मधेच जंगल, मधेच उघडीबोडकी टेकडी असा रमतगमत रस्ता होता. पण तोरण्याच्या अलीकडील चढणीने सगळ्यांचा दम काढला.  आमच्यातील काहीजण वाटाड्या मामांसोबत, मेंगाई देवीच्या मंदिरात रात्री झोपण्यासाठी जागा मिळावी म्हणून धडपडत पुढे गेले.  त्यात उमेश आघाडीवर होता.

राजगड ते तोरणा या सोंडेवरून 


मागे आम्हाला उन्हाचा कडाका जाणवत होता. त्यातच विराजच्या पायाला गोळे येण्यास सुरुवात झाली.  याचा अनुभव मी याआधी हरिश्चंद्रगडावर घेतला होता.  दमवणाऱ्या वातावरणामुळे मी, ओंकार, गायत्री, पुष्कर, विराज आणि प्रथमेश जरा उशीराच बालेकिल्ल्यावर पोहोचलो. पण वर आल्यावर कानद नदीवरील धरणामुळे हवेतील गारवा सुसह्य करत होता.
मेंगाई देवीच्या मंदिरात सगळ्यांनी जागा पकडल्या. आम्ही मागचे येईपर्यंत कोणीही जेवायला बसले नव्हते. चार वाजायच्या सुमारास आम्ही शिदोरी सोडली. भारती, अक्षता, विराजने बॅग मधून पिठलं बाहेर काढलं. भाकरी, कांदा, चटणी आणि रसरशीत लोणचं. काय शांत वाटत होतं. पुष्करने कांदा, लोणचं आणि पिठलं ही नवीन डीश शोधून काढली. जेवण झाल्यावर सर्वांना जरा मोकळीक मिळाली. काहीजण सूर्यास्त पाहायला गेले, काही मंदिराच्या आवारात पहुडले.
संध्याकाळची लाकूडफाटा, पाण्याची व्यवस्था पाहून आलो. पाणी खूप छान होते. सहाच्या सुमारास फक्कड चहा झाला.  सगळी बिस्किटे बाहेर आली. त्यानंतर लगेच खिचडी अन् सूपची तयारी सुरु झाली.  सगळेजण गरमागरम शेकोटीशेजारी कोंडाळं करून बसले होते.  दोन- तीनदा सूप चा राउंड झाल्यावर अगदी योग्य प्रमाणात शिजलेल्या खिचडीकडे मोर्चा वळला. सोबत पापड लोणचं होतंच. पोटभरून खिचडी खावूनसुद्धा शिल्लक राहिलीच. 
आता वेळ होती तोरण्यावरील खास भूतांच्या गोष्टींची. पण यातील मुख्य पात्र गायत्री, तिने ऐनवेळी माघार घेतली.  दिवसभर उन्हातील पायपीट, स्वयपाक यामुळे जरा दमली होती. आनंद, अमोलदादा, मनोज, पुष्कर, भारती यांच्या अनुभव, ऐकीव भूत कथाकाथानाने रात्र रंगवली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लिडरने उठावयास सांगितले परंतु सगळे अनुभव ऐकल्याने कोणीही एकटा कुठेही जात नव्हता.  शेकोटीपासून दूर गेल्यावर थंडी जीव काढत होती. विस्तव पूर्णपणे शांत करून मी आणि प्रथमेश मंदिरात गेलो. कुठेतरी जागा अॅडजस्ट करून स्लीपिंग बॅग मध्ये शिरलो, ते रात्री काही आवाज आल्यास शेजारच्याला जागं करण्याच्या बोलीवरच.
सूर्योदय पाहण्यासाठी सगळे लवकर उठले. आवरून चहा घेऊन झुंजारमाचीकडे निघालो. जबरदस्त किल्ल्यावरील तितकीच सुंदर माची. थोडासा कठीण टप्पा पण सकाळी लवकर गेल्यामुळे रविवारच्या जत्रेआधी आम्ही माची पाहून आलो. एकीकडे वेळवंडी तर दुसरीकडे कानद नदीचे खोरे. सुंदर आणि अप्रतिम. खाऊन, भांडी धुवून झाल्यावर सगळ्यांनी सॅक पॅक करून घेतल्या. तोरण्यावर आदित्य गोखले, ट्रेक क्षितीज सोबतच ट्रेक करणारे डॉ. विनोद यांची गाठ पडली.  मेंगाई देवीच्या मंदिरासमोर ग्रूपफोटो घेऊन वेल्हाच्या दिशेने उतरण्यास सुरुवात केली.
झुंजार माची 


वाट तशी कठीणच, डोक्यावर सूर्य नारायण, रविवारची गर्दी हे अडथळे पार करूनही दोन तासात वेल्ह्यात पोहोचलो. वाटेत चरतच आल्यामुळे भूक अशी नव्हतीच. पण रात्री पोहोचण्यास होणारा उशीर लक्षात घेता सगळ्यांनी दोन दोन घास पोटात ढकलले. जेवण झाल्यावर न मिळालेल्या आईस्क्रीमसह मला आणि प्रथमेशला गुंजवण्यात सोडून डोंबिवलीकर वेगाने एक्सप्रेस वे कडे मार्गस्थ झाले.
जेव्हा दोन तीन दिवसाचा ट्रेक असतो तेव्हा नवीन मैत्री खूप छान होते, जुनी नाती नव्याने विणली जातात. आनंद, मनोज, पुष्कर असे नवीन पण आधीच भेटले असावेत असे सवंगडी, बऱ्याच दिवसांनी भेटलेले चंदू आडे, नेहमीचेच रुळलेले विराज, भारती, अक्षता (अकाउंटंट), गायत्री, ओंकार, अमोलदादा, द्रूमन (प्रद्युम्न) सगळ्यांनी धमाल आणली. नवा नवखा छोटा विराज यातूनही खूप काही शिकला.
मला हेल्मेटमुळे साताऱ्याला न जाऊ देणारे असे कुटुंबीय क्वचितच कुणाला मिळत असतील.

असेच भेटत रहा ट्रेक करत रहा, इतिहास आणि निसर्ग जपत राहा. 

Wednesday, February 1, 2017

छोटासा पण सुंदर किल्ला-सोंडाई

            तसं पाहायला गेलं तर नावापासून सुरुवात होती.प्रथमच नाव ऐकत होतो,सोंडाई.विसापूरच्या वेळीच शार्दुल कडे नाव दिला होतं.तयारी महिनाभर आधीच चालू झाली होती रिझर्वेशन पासून.ठरल्याप्रमाणे मी आणि ओंकार (माणकेश्वर) २ जुलैला सिद्धेश्वरने बसलो. ५.३० च्या आसपास कर्जतला उतरलो.दौंडच्या पुढेच पाऊस कोसळायला सुरुवात झाली होती.अक्षरशः रप रप आवाज येत होता.ट्रेकक्षितिज टीम आम्हाला ७.३० च्या सुमारास लोणावळ्यात  भेटली.प्रथमेशही पुण्यातून आला होता.पोहे व चहाचा करून सहा टमटम मधून ‘वाव्हरले’ गावाकडे निघालो.
          सोबत मेंबर्स बरेच होते.त्यामुळे मजा येणार होती.सोबतीला पाऊस होताच.आमची संख्या ४७ पर्यंत गेली होती.ओळख परेड झाली.सहा वर्षांची ‘सांज’ पासून सुमती काकुंपर्यंत सगळे उत्साहात होते.जातानाच एक छोटं धरण लागलं.’वाव्हरले’ गावाच्या मागेच बांध घातला होता.तो पार करून सोंडाईकडे निघालो.पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता.त्यामुळे आजूबाजूची सर्व डोंगररांग झरे आणि धबधब्यानी भरून गेली होते.अशाच एका धबधब्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेतला.घसरगुंडी,दंगा यामुळे सर्वाचा आनंद ओसंडून वाहत होता.

          काही वेळातच एका सपाट ठिकाणी येऊन पोचलो.जोडटाक्यांनी दर्शन दिले.इतक्यातच त्यांची स्वच्छता झाल्याचे शार्दुलने सांगितले.तीसुद्धा भरून वाहत होती.त्या ठिकाणापासून माथ्यावर जाण्यासाठी शिडीची व्यवस्था केलेली आहे.शिडीच्या वरच्या तोंडाशीच एक जोडटाके नजरेस पडते.
          माथ्यावर काही देवी देवतांच्या मूर्ती,घंटा अशा गोष्टी पहावयास मिळतात.या देवी सोंडाई नावाने गावात ओळखल्या जातात.कोणतीही निवाऱ्याची सोय गडावर नाही.वारा आणि पाऊस अक्षरशः बोचत होते.तिथेच वर निमिशाने आजूबाजूच्या प्रदेशाची आणि किल्ल्याची ओळख करून दिली.माथेरानचा डोंगर,मोरबे धरण येथून स्पष्ट दिसतात.टेहेळणीसाठीचा किल्ला हाच या किल्ल्याचा मुख्य उद्देश असावा.मी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली.किल्ल्यांवरील ‘टाक्यांचे महत्व’त्यांची रचना इ.ची माहिती सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला.

              खाली उतरताना सुद्धा पावसाने उघडीप दिली नाही.एका ठिकाणी जेवणासाठी डबे सोडले.अश्विनीच्या कृपेमुळे यावेळीही ‘मेजवानी’ मिळाली.पावसाने कृपा केली.जेवण झाल्यावर एक छानसा खेळ खेळलो.काही नाटिका सादर केल्या.धमाल आली.


              ४.३० पर्यंत सोंडेवाडी गावात उतरलो.ही वाट अतिशय साधी आहे.पावसामुळे थोडी घसरडी बनली होती एवढंच.सांजनेपण मस्त साथ दिली.गोड आहे मुलगी.छानसे फोटोज काढले.पावसाळ्यातला पहिला ट्रेक मस्त झाला.अक्षरशः शरीराचा प्रत्येक भाग भिजला.पावसामुळे अधिक रंगत आली.ट्रेकक्षितिज सदस्यांची साथ नेहमीप्रमाणे मिळाली.शर्दुलने या एवढ्या मोठया ताफ्याला छान सांभाळले.सर्वांच्या शिस्तप्रिय वागण्याने जोरदार पावसातही ट्रेक उत्तम पार पडला.पुण्यातून ओंकार सोबत ११.०० वाजता Passenger ने निघालो.नेहमीप्रमाणे Late Passenger ने ९.०० सकाळी सोलापूर गाठले.