Tuesday, April 21, 2020

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरचा हातगड किल्ला


                                    
पाडव्याच्या वेळेस ट्रेकक्षितीज संस्थेचे पुढच्या सहा महिन्यातील ट्रेक्सचे शेड्युल ठरत असते आणि राहुलने यावेळी विचारलं होतं की हातगड किल्ला लीड करणार का,  संस्थेमार्फत  अशी संधी पहिल्यांदाच मिळत असल्याने मी आनंदाने कशाचाही विचार न करता होकार दिला. ट्रेकचे वेळापत्रक आल्यावर तारीख दिसली बारा मार्च २०१७  म्हणजेच होळी पौर्णिमा होती.
मला वेगळीच भीती होती. ट्रेकच्या दिवशी होळी पोर्णिमा असल्यामुळे किती सदस्य ट्रेकला येतील. परंतू, किल्ला संस्थेच्या इतिहासात बहुतेक प्रथमच करत असल्यामुळे माझ्याकडे बऱ्याच आधीपासूनच नावे यायला सुरुवात झाली होती. पुण्यातून सुद्धा चांगला प्रतिसाद आल्याने पुणेकरांसाठी स्वतंत्र  गाडी करण्यात आली. शेवटी ट्रेकच्या आदल्या दिवशी मला डोंबिवली मधून काही जणांना नकार द्यावा लागला आणि पुण्यातून संख्या जास्त झाल्याने मी आणि प्रथमेश डोंबिवली मधून ट्रेकला जाण्याचा निर्णय घेतला. पुण्याची जबाबदारी श्रीकृष्णकडे सोपवून मी निर्धास्त झालो.  रेल्वेच्या सावळ्या गोंधळामुळे मला आणि प्रथमेशला डोंबिवलीला पोहोचायला जरा उशीरच झाला. मग आम्ही अमित दादाकडे छानपैकी लीनाताईच्या हातचे जेवण करून टिळक पुतळ्यापाशी पोहोचलो. आम्हाला टिळक पुतळ्यापासून निघायला बारा वाजले.  माझ्या अनुपस्थितीत कौस्तुभने सशक्तपणे सर्व गोष्टी हाताळल्या.
ग्रेट दांडेलीकॅन्सल झाल्यामुळे विराज, मंदार, निमिषा आणि अश्विनीसुद्धा गाडीत दाखल झाल्या होत्या.  मी त्यांना बघून इतका हसलो कीविचारायची सोय नाही.कारण मी या चौघांच्या बराच मागे लागलो होतो परंतू दांडेलीला जायचे असल्याने ते आयला तयार नव्हते. ३१ सिटर गाडी मी निश्चित केली होती परंतू ऐनवेळी वाढलेल्या संख्येमुळे नाशिकमधून आमच्या सोबत येणारे इतिहासतज्ञ सुदर्शन कुलथे यांना पकडून ३३  जण आम्ही गाडीत होतो. सगळे Adjust  होतील या अंदाजाने मी शेवटच्या क्षणी निमिषा आणि मंदारला होकार कळवला. पुण्यातून श्रीकृष्ण आणि मंडळी अकरा तारखेला जरासे उशीराच म्हणजे रात्री नऊ वाजता निघाले होते. त्यामुळे ते नाशिकमध्ये लवकर येणार नाहीत म्हणून मी निश्चिंत होतो.
कसाराच्या अलीकडे ढाब्यावर नेहमीप्रमाणे कपभर चहा घेऊन पुढील प्रवासाला लागलो. एक दिवसाचा सोपा छोटा ट्रेक अशी जाहिरात केल्याने बरेच नोन – मेंबर ट्रेकला आले होते. घाटामध्ये कंटेनरच्या धडकेमुळे ट्राफिक लागले त्यामुळे आमचा वेग मंदावला पण आम्ही पहाटे चारच्या सुमारास कुलथे सरांना घेऊन नाशिकमध्ये द्वारका चौकात पोहोचलो. काही वेळातच पुणेकरांची गाडीपण तिथे दाखल झाली. आता दोनीही गाड्या एकत्रचहातगड कडे निघाल्या . मी, अश्विनी आणि गौरव तिघेही जागेच्या अभावी म्हणा किंवा दंगा करण्यासाठी म्हणा आमच्या गाडीच्या पुढच्या भागात बसलो होतो. दिंडोरी वणीमार्गे डोंगर रांगांची अंधुक रेषा पाहतच आम्ही सकाळी सहाच्या सुमारास हागडवाडीमध्ये पोहोचलो. चंद्राच्या चांदण्यात वाटेत येणारे प्रत्येक डोंगर, ओझरखेड धरणाचे पाणी खूप शांत भासत होते.


गावात आल्यावर मला पायलट ट्रेकच्या वेळेस भेटलेले वन विभागाचे अधिकारी श्री.महाले यांना फोन करायचा प्रयत्न केला पण बीएसएनएलच्या कृपेमुळे अडचणी मध्ये भरच पडली. गावात स्वच्छ भारत अभियान असल्याने प्रातर्विधीची अडचण निर्माण झाली कारण ४२ जणांसाठी इतक्या लगेच सोय होणे कठीण होते. यातच सुदर्शन सरांच्या सल्ल्याने गावाला लागूनच असलेल्या हायवेवर एका हॉटेलमध्ये चौकशी करून टॉयलेट वापरण्याची परवानगी मिळाली आणि त्याच “अद्विती” हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना आम्ही त्यांच्या खोल्यांमधून झोपेतून उठवलं आणि नाश्ता, चहा करून देण्याची विनंती केली. अनायसे किल्ल्याच्या पायथ्यालाच सर्व सोय  चांगली झाली. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण जवळ असल्याने आणि पलीकडे गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने हातगडला रिसॉर्टचे पेव फुटलेले लक्षात येत होतं.
सर्वांनी पोहे आणि चहा घेऊन पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन चढायला सुरुवात केली. रस्त्याच्या मार्गाने सर्वजण २० मिनिटांतच किल्ल्याच्या पायऱ्यांपाशी पोहोचलो. सर्व ४२ जणांनी संस्थेच्या प्रथेप्रमाणे आपापली ओळख  करून दिली आणि सर्वजण किल्ल्याकडे निघाले. किल्ला तसा विस्ताराने छोटा असल्याने वेळेचे  बंधन थोडं शिथिल केलं होतं पण पुन्हा सूर्य डोक्यावर यायच्या आत खाली उतरणे आवश्यक होते. सर्वानी प्रवेशव्दाराच्या जवळच असलेल्या कुलथे सरांनी शोधलेल्या संस्कृत मराठी शिलालेखाकडे मोर्चा वळवला. त्याचे सर्वात जास्त आकर्षण आम्हा सर्वाना होते. सोळा ओळींचा देवनागरी लिपीतील जवळजवळ पाचशे वर्षे जुना हा शिलालेख किल्ल्यातून प्रवेश करताना डाव्या बाजूला काही अंतरावर आहे. बागुल वंशीराजाने निजामाचा केलेला पराभव याची माहिती शिलालेखातून  मिळते. या लेखाच्या खाली डावीकडे काही चित्राकृती कोरलेल्या आढळतात. त्या अजूनही रहस्यच राहिल्या आहेत.


किल्ल्यात प्रवेश करतानाच चार प्रवेशद्वारांची रचना आहे. एकावेळी एक अथवा दोनच व्यक्ती जातील अशी त्यांची रचना केली आहे. काही वेळातच आपण किल्ल्याच्या मुख्यभूमीवर येतो. डावीकडे एक तटबंदी अजूनही शाबूत आहे. तिकडून सापुतारा घाट, सापुतारा शहर यांचे सुंदर दृश्य दिसते आणि या किल्ल्याची उपयुक्तता लक्षात येते. गडप्रदक्षिणा करताना आपल्याला सात ते आठ पाण्याची टाकी दिसतात. त्यावरून किल्ल्यावर सैनिकांचा बराच राबता होता याचा अंदाज येतो. शिवपिंडीपासून पुढे गेल्यावर बुरुजाच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण धान्यकोठार दिसते. पुढे विटांनी बांधलेले दारुकोठार, सरदाराचा वाडा , मुदपाकखाना लक्ष वेधून घेतात. या सर्वांच्या नोंदी इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत. या सर्व वास्तूंची सुंदर माहिती सुदर्शन कुलथे सरांनी दिली. किल्ल्यावरून साल्हेर-सालोटा, सप्तशृंगी, मार्कंड्या ही पर्वत शिखरे सहज नजरेस पडतात. एका पठारवजा जागेवर सर्वांना एकत्रित करून ट्रेकक्षितीज संस्थेची माहिती, वॉकिंग ओनएज हा प्रकल्प, हागडबद्दल माहिती दिली गेली.

आम्ही खाली उतरताना पायवाटेने उतरलो. काही अंतरापर्यंत पायऱ्या  बांधल्या होत्या. वाडीमध्ये पोचल्यावर किल्ल्यावरून दिसणाऱ्या  एका जुन्या वास्तूंचे ज्याला गावातील लोक घोड्याची पागा म्हणतात आणि शेजारील बांधीव तलाव पाहिला.
गावातील एका शेणाने सारवलेल्या घराच्या व्हरांड्यात आम्ही जेवणासाठी थांबलो. आमच्या सोबत वनसंरक्षमहाले सर, त्यांचे सहकारी होते. जेवणात नेहमीप्रमाणे अश्विनी कृपेने चटकदार स्वादिष्टपूर्ण पदार्थांचा भरणा होता. श्रीखंड आणि पुरणपोळीने मजा आणली. संदीप सर,  अमिता या आमच्या बँकवाल्यांना माझा खरा चेहरा दिसत होता. चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊन एक मस्तपैकी ढेकर दिली. गावातील एक प्रतिष्ठीत असे कुटुंब, मोरे- देशमुख यांनी आम्हाला त्यांच्या घराण्याबद्दल,गावाबाबत काही माहिती सांगितली. त्यांनी सांगितलेल्या माहितीवर सर्वानी आपापसातच वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. ते आपणहून माहिती देण्यास आले होते. तशी माहिती रंजक वाटली. गावात गोमाजी मोरे-देशमुख यांच्या रेखीव समाधीचे दर्शन घेऊन आम्ही हातगडवाडीला निरोप दिला.
जातानाच वाटेवर एका ठिकाणी वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकाराच्या वीरगळ एका चौथऱ्यावर व्यवस्थितरित्या मांडून ठेवल्या आहेत. त्या पाहून स्ट्रॉबेरी घेत आम्ही एका प्राचीन मंदिराकडे निघालो. मुंबई पुण्यापासून बऱ्यापैकी लांब अंतरावर येऊन केवळ हे मंदिर पाहण्यासाठी येणं जरा कठीणच होते काहीसा उशीर होत असतानाही मंदिर पाहण्याचा निर्णय घेण्यात आला.


                            देवळी कराड                                                                                                           सापुतारा नाशिक रस्त्यावर अबोना गावाकडे जाताना थोड्या आडवाटेवर महादेवाचे सुंदर मंदिर आहे. मंदिर काळ्या  पाषाणातील असून कलाकुसरीने युक्त आहे. सुदर्शन सरांमुळे मंदिराची माहिती मिळाली. ते सुंदर मंदिर डोळ्यात साठवून नाशिककडे मार्गस्थ झालो.


पुढे डोंबिवलीकर, त्यांच्यामागे आमचे नाशिक मधील संस्थेचे सदस्य सचिन मुसळे यांच्या गाडीत मी, सुदर्शन सर, प्रथमेश आणि त्यामागे पुणेकर असा प्रवास सुरू झाला. नाशिक रस्त्यावर चांभारलेणी, किल्ले रामशेज पाहतच नाशिकला पोहोचलो. मला आणि प्रथमेशला नाशिककरांनी नाशिक बसस्थानकावनिरोप दिला.
मी, प्रथमेश विना थांबा गाडीने छान झोप काढत रात्री दहा वाजता पुण्यात पोहोचलो.ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीरच झाला परंतू इतके सुंदर मंदिर पहायला मिळाल्याने तसे काही वाटले नाही. डोंबिवलीकर आणि इतर पुणेकर वेळेत घरी पोहोचले. माझा लीडर म्हणून पहिलाच अनुभव पण अमित दादा आणि श्रीकृष्ण यांच्यामुळे काही जाणवले नाही.कौस्तुभ आणि वरुणने सुद्धा छान साथ दिली. छोटासा पण महत्वाचा किल्ला संपूर्णपणे पाहिल्याचं समाधान मिळालं.