Tuesday, February 18, 2025

Belgaon to Hampi Day Two - बेळगाव ते हंपी दिवस दुसरा - मुक्काम पुन्हा दांडेली

 दिनांक 20 डिसेंबर सोमवार 


काल संध्याकाळी विश्रांतीने सर्वांना ताजतावाने केले होते. आज संपूर्ण दिवस विश्रांती साठी राखीव ठेवण्यात आला होता. सकाळी सातच्या आसपास एक छोटासा जंगल ट्रेक करून सर्वजण नाश्त्यासाठी पुन्हा एकत्र जमलो. आधी नकार, मग सर्वांची उपस्थिती आणि शेवटी मस्त एकत्रित फोटो अशाप्रकारे छान जंगल फेरी झाली. नाश्ता झाल्यावर सर्वांनी पाण्याच्या खेळांकडे जाण्यासाठी मोर्चा वळवला. नवीन जर्सी घालूनच पाण्यात उतरण्याचे ठरवलं आणि आमच्या एकूण पॅकेज मध्ये उपलब्ध असलेले सर्व खेळांचे प्रकारा अनुभवले. तसेच या पॅकेज मध्ये नसलेल्या एका खेळ प्रकारही अनुभवला. तसेच या खेळासाठी कंपनीने  फोटोची सोय केल्याने हे सर्व आठवणींमध्ये तसेच कॅमेरातही कैद झाले. यामध्ये एका खेळामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये म्हणजेच काली नदीमध्ये संजय सरांना आपसूक स्नान करण्याची संधी मिळाली.



 निलेश सरांनी याची राईड सुरू व्हायच्या आधीच धसका घेतला होता. परंतु water river rafting चा एक नवीन अनुभव सर्वांनाच सुखावून गेला.


सर्वांनाच कडकडून भूक लागली होती. परंपरा रिसॉर्टचे वैशिष्ट्य म्हणजे जेवणातील विविधता. सर्वांनी पोटभर जेवण करून निद्रेला जवळ करण्याचा पर्याय निवडला. झोपण्याआधी सर्वांनी पुनश्च ओ शेठ गाण्याचा आनंद घेतला. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांनी सायकलच्या दुरुस्त करून टकाटक केली. सायकलचे पंचर काढले गेले. संजय सरांनी त्यांची सायकल desembled करून धुवून काढली. शहा सरांच्या सायकलचे ब्रेक नीट करण्यात आले. उद्यासाठी सर्वांनी सायकल तयार केली. संध्याकाळच्या परंपरा मध्ये कॅरम, झोपाळा तसेच जेवणाच्या वेळी शहा सरांच्या विनंती मुळे सुंदर गाण्यांचा आस्वाद घेता आला. आचारी साहेबांनी आज माशाचा बेत आखला होता.  त्यावर ताव मारून झाल्यावर अशातच उद्या पहाट निघण्याची तयारी सुरू झाली. शहा सरांनी गोड बोलून पहाटे चहा आणि ब्रेड बटर ची व्यवस्था होईल असे पाहिले. रूम मध्ये जाण्याआधी इथला मालकाच्या मुलाची भेट झाली. आम्ही आमच्या बाजूने सर्व कमी जास्त गोष्टी त्यांना सांगून काही काळ शेकोटीजवळ थांबून डॉरमेट्रिककडे निघालो. पहाटे लवकर निघायचे असल्याने सर्व बॅग व्यवस्थित आवरून ठेवली. सकाळी अंगावर कोणते चिलखत घालावयाचे, ते बाजूला काढले आणि मस्तपैकी दिवसभरातील फोटो व्हिडिओ पहात झोपी गेलो.


Belgaon to Hampi Day One - बेळगाव ते हंपी दिवस पहिला - मुक्काम दांडेली


दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी - रविवारी पहाटे पाच वाजता सर्वजण तयार होऊन बेळगाव कडे आमच्या गाडीनेच निघालो. शिवाजी विद्यापीठाच्या समोर मस्तपैकी चहा घेतला आणि बेळगाव रस्त्याला लागलो.


कोल्हापुरातून बेळगावला जाणाऱ्या रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे आम्ही वेळेत बेळगाव मध्ये दाखल झाले. मुख्य चिंता होती ती म्हणजे सीमा पार करण्याची. म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर प्रवासातले कुणीही कोविडने आजारी नाही याबाबतचे कोविड निगेटिव्हचे रिपोर्ट आमच्याकडे होते. याबाबत तपासणी होणार असे ऐकून होतो आणि त्याबाबत आम्ही खबरदारी घेतली होती. परंतु आमच्या चालकाने कोणत्याही प्रकारची टेस्ट केली नसल्यामुळे थोडी चिंता वाटत होती. परंतु देव कृपेने आम्ही यातून पुढे गेलो. पोलिसांनी नाक्यावर काटेकोर तपासणी केली नाही त्यामुळे बेळगावकडे जाणे सुकर झाले.


बेळगावमध्ये दाखल झाल्यावर आमच्या या प्रवासातील पहिल्या मेदूवड्याचा आस्वाद गावातील एका उडपी हॉटेलमध्ये घेतला. जोडीला पायनपल शिरा आणि कॉफी होतीच. नाश्ता झाल्यावर सर्वांनी आपापल्या सायकल गाडीतून बाहेर काढल्या, स्वतःला थंडी, ऊन यापासून संरक्षित करण्याजोगी साधने परिधान केली, नवीन तयार केलेली जर्सी अंगावर चढवली आणि आपल्या आपल्या बाटल्यांमध्ये पाणी भरून, मस्तपैकी फोटो वगैरे काढून आम्ही सर्व आमच्या पहिल्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच दांडलीकडे सायकल प्रवास सुरू केला.


सुरुवातीचा सगळा रस्ता बेळगाव गावामधूनच होता. सगळीकडे मराठी भाषेतील पाट्यांचे अस्तित्व जाणवत होते. गोमटेश मराठी शाळेच्या मैदानावर संघाची शाखा भरलेली दिसून आली. नुकताच या भागात येळूर जवळ गावाची पाटी मराठी भाषेत लावल्यावरून तणाव निर्माण झाला होता. याच येळूर गावावरून पुढे राजहंसगड या गावावरून पुढे निघालो. वाऱ्याचा वेग चांगला जाणवत होता. काही वेळातच माझी सायकल पंक्चर झाल्याचे जाणवले. ट्रॅव्हलर मधून संजय सरांची दुसरी सायकल घेऊन पुढे प्रवासाला सुरुवात केली. अधून मधून रस्ता खराब होता. संपूर्ण रस्ता सरळ नाही. तसेच बराचसा रस्ता संपूर्ण जंगलातून आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम असल्यामुळे हवा तसा वेग मिळत नव्हता. प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हमखास दिसत होता. दोन-तीन ठिकाणी रस्ता चुकण्याचे प्रकार सुद्धा झाले. लांब पल्ल्याच्या प्रवासात अशा गोष्टी घडत असतातच. रामवाडी या गावावरून दांडेली रस्त्याला लागलो. शेवटचा टप्पा सुखावह होता. घाटरस्ता उताराचा होता. दांडेलीच्या अलीकडे गणेशगुडी गावाजवळ परंपरा कॉटेजेस या ठिकाणी आम्हाला पोहोचायचे होते. मी आणि महेश सर थोडी चौकशी करण्यासाठी पुढे गेलो आणि काही वेळातच आमची गाडी आणि इतर सर्वजण परंपरामध्ये दाखल झाले. दुपारचे साडेतीन वाजले होते. आमचे सर्वांचे सरासरी 90 किलोमीटर सायकलिंग झालं होतं. माझं हे आजपर्यंत सर्वात जास्त सायकलिंग अंतर होतं.

या पुढचा दिवस पूर्णपणे विश्रांतीचा होता. संजय सरांनी परंपरा कोटेजमध्ये पूर्ण डॉर्मेट्री बुक केली होती. आमच्या संख्येपेक्षा तिथे जास्त बेड असल्यामुळे आमच्या बॅगांचीही झोपायची स्वतंत्र सोय झाली होती. काही वेळातच आम्ही आवरून खाली जेवायला गेलो. जेवून झाल्यावर सर्वांनी एक छान वामकुक्षी घेतली. संध्याकाळच्या सुमारास गप्पा, चहा, त्यानंतर शेकोटी असा निवांत कार्यक्रम झाला. रात्रीचे जेवणही झकास बनवले होते. उद्या सकाळचा कार्यक्रम निश्चित करून निवास स्थानाकडे वळलो. 




समोरच असलेल्या बाल्कनीमध्ये गप्पा झाल्या. सर्वांचे या आधीच्या सायकल सफरींचे अनुभव ऐकत, गाणी ऐकत आजच्या दिवसाची सांगता झाली.



Day Zero Belgaon to Hampi Cycling - बेळगाव ते हंपी सायकल प्रवास दिवस शून्य

 कोरोणाच्या काळामध्ये एका नवीन सदस्याने आमच्या घरामध्ये जून 2020 मध्ये प्रवेश केला, ती म्हणजे माझी सायकल. त्यात पण गिअरची सायकल. हो नाही करत करत ती आमच्या घरात आली आणि कुतुहालाचा विषय बनली. मग कधी कात्रज घाट तर कधी कधी पानशेत असा प्रवास सुरू झाला. लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच वेळा आमच्या ऑफिस वाऱ्या सुरू झाल्या. जनता बँकेमध्ये नवरे सर, गायकवाड सर यांचा लांब पल्ल्याचा सायकल प्रवास करणारा ग्रुप आहे हे जाणून होतोच. परंतु ऑफिस ते घर तेवढे पुरे करतोय ते भरपूर झाले, या विचारामुळे अजून तरी कुठेही लांब पल्ल्याच्या सहलीला जाण्याचा विचार नव्हता.


अशातच आमच्या मुख्य कार्यालयाचे ऑक्टोबर नोव्हेंबर च्या आसपास स्थलांतर होणार असे वारे वाहू लागले. याच सुमारास संदीप देशपांडे सरांनी डिसेंबरच्या मध्यावर बेळगाव ते हम्पी सायकल प्रवासाकरीता चल असा आग्रह धरला. एवढी लांब व सलग सायकल कधीच चालवली नव्हती. बरेच आधेवेढे घेऊन होकार कळवला. दररोजच्या थोड्या थोड्या सरावाने धीर यायला लागला. डिसेंबरच्या सुरुवातीस बरीच दुकाने पालथी घालून माझ्या एमटीबी करिता लहान आकाराचा टायर मिळतोय का याची चाचपणी झाली व शोध घेऊन नवीन लहान आकाराचे टायर बसवून घेतले. बाकी सहा जणांकडे हायब्रीड प्रकारातील सायकल होती. माझ्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून हा खटाटोप करावा लागला. पण त्यानंतर लक्षात आले की विक्रम म्हणजे माझा आत्येभाऊ, त्याच्या मित्राकडे म्हणजेच अनिरुद्ध कडे त्याची एक हायब्रीड सायकल्स पडून आहे. मग काय सर्व धडपड करून एका रात्रीत ही सवत माझ्या पार्किंग मध्ये दाखल झाली.


काही दिवस याच हायब्रीडवर सराव केला आणि याच सायकलने प्रवास करायचा हे नक्की केले. दिनांक 19 ते 25 डिसेंबर 2021 असा एक कच्चा प्लॅन कॅफे गुडलक येथे नक्की झाला. सात जण नक्की होतेच. ट्रॅव्हलर गाडी आणि सात-आठ सायकलचा सेट अशी बांधणी नक्की झाली. नेमके याच दरम्यान म्हेवणीचे 24 डिसेंबरला सोलापूरला लग्न होतं, त्यामुळे तन्वी 13 तारखेलाच सोलापूरला पळाली होती. त्यामुळे निवांत होतो. कुठल्याही दौऱ्याच्या आधी एक decathlon मध्ये फेरी ठरलेली असते. तशीच यावेळी सुद्धा झाली.

आज दि. 18 डिसेंबर, शनिवार असल्याने काही जणांनी पूर्ण दिवस तर काहींनी अर्धी सुट्टी काढली होती. मी सुद्धा बँकेमध्ये थोडे काम बाकी असल्यामुळे ते पूर्ण करून वेळेत घरी आलो. बँकेत जातानाच सकाळी सर्व बॅग आवरून बँकेत गेलो होतो. दुपारी घरी आल्यावर सामानाची बांधा बांध केली आणि सायकल वरूनच सिंहगड रस्त्यावरील संजय सरांच्या घरी पोहोचलो. तिथे सर्व एकत्र येऊन चहा झाला, सर्व सायकलस् व्यवस्थित गाडीमध्ये बांधल्या गेल्या ( संजय सरांनी बॅक अप म्हणून त्यांची एक जादाची सायकल पण सोबत घेतली होती) आणि आम्ही आमच्या पहिल्या मुक्कामाकडे म्हणजेच कोल्हापूर प्रस्थान केले. 


Traveler मध्ये ठेवण्यात आलेल्या सायकल


वाटेतच कराड येथे ढवळीकर सरांच्या मित्राच्या पंकज हॉटेलमध्ये स्वादिष्ट जेवण केले. तिथेच कराड शाखेतील दोन सेवकांनी आमच्या सर्वांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.


साधारण शनिवारी रात्री अकरा वाजता आम्ही कोल्हापुरात दाखल झालो. येथे कोल्हापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक - म्हाकवेकर साहेबांनी बँकेच्या गेस्ट हाऊस मध्ये आमच्यासाठी छान व्यवस्था करून ठेवली होती. उद्या सकाळी बराच मोठा प्रवास असल्याने सगळी आवरा आवर करूनच आम्ही झोपलो

सायकल वारी!!!

पंढरपूरची वारी करावं असं खूप दिवसापासून मनात होतं. पूर्ण वारी इतक्यात तरी शक्य वाटत नव्हती परंतु पायी वारीमध्ये एक टप्पा सासवड पर्यंत वगैरे करावा असेही वाटत होतं. पुण्यातील तीन संस्थांनी ( MAA, WoW आणि Pedalwali) एकत्र येऊन पुणे ते पंढरपूर सायकलवारीचे आयोजन केले आहे असा एक मेसेज ग्रुप वर आला होता. मेसेज पाहिल्यानंतर मी आपल्याला बुवा हे शक्य नाही म्हणून लक्ष दिलं नव्हतं परंतु संदीप देशपांडे यांनी मागे लागून आम्हा दोघांचे एका वेळेचे जाण्याचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेतले. रजिस्ट्रेशन तरी केले परंतु म्हणावा तसा सराव होत नव्हता. भावाचं लग्न आणि संघाचा प्रथम वर्षाचा वर्ग यामुळे सरावाला खूप कमी दिवस मिळाले. चार जूनला वर्ग संपला आणि पाच जून पासून सलग चार दिवस तयारी करायची असे मला ठरवले. ठरवल्याप्रमाणे कधीच होत नसते, त्यानुसार चार दिवसांपैकी दोनच दिवस सराव झाला आणि बघता बघता दहा तारीख उजाडली.

म्हणतात ना देव असतो पाठीराखा त्यानुसार तब्येत साथ देत नसतानाही आदल्या दिवशी आत्याचा गोळ्यांचा डोस घेऊन दहा तारखेला सायकल घेऊन पहाटे पावणेतीन वाजता घर सोडलं आणि सारसबागेच्या इथे एकत्र आलो.
ही पंढरीची वारी तीन वेगवेगळ्या संस्थांनी एकत्रित आयोजित केल्यामुळे बऱ्यापैकी तिथे एकमेकांचे ओळखीचे होते.
वारीच्या ग्रुप मध्ये जितेंद्र शहा सरांचे नाव बघून जरा हायसे वाटले. संजय सर (गायकवाड) त्यांच्या बहिणीला आणि आम्हाला सी ऑफ करायला आले होते. साधारण पहाटे पावणे चारच्या सुमारास सारसबाग येथील चमूने हडपसर मार्गे पंढरपूर कडे प्रयाण केले.

भक्ती शक्ती, कोथरूड आणि सारसबाग या तीन ठिकाणाहून एकत्र येऊन हडपसर येथे आमची वारी एकत्रितपणे सुरू होणार होती. परंतु सारसबाग येथील ग्रुप हडपसर येथे वेळेच्या आधी पोहोचला त्यामुळे सर्वांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी सात वाजताच नाश्त्याच्या ठिकाणी म्हणजेच चौफुला येथील गुरुदत्त हॉटेलवर येथे पोहोचलो.
आत्तापर्यंत चोपन्न किलोमीटर सायकल चालवून झाली होती. गुरुदत्त हॉटेलवरील जंबो वडापावची चव जिभेवर रेंगाळत ठेऊन कुरकुंब येथे पाण्याच्या स्टॉप ( hydration point) दिशेने निघालो.

टप्प्या टप्प्यावर येणारे पाण्याचे स्टॉप खूप मदत करत होते. पळसदेव-भिगवण येथील टप्पा खूपच कठीण होता. दिसणारे चढ आता जीवघेणे वाटत होते. डोक्यावर सूर्य देवाने आपले हात पसरायला सुरुवात केली होती. इंदापूर फाट्यावरील हॉटेल माऊली प्रसाद येथे सर्वांनी एकत्रित जेवण केले. एकदा सायकलवरून उतरून पुन्हा सायकल वर चढून सायकल चालवणे हा सर्वात त्रासदायक प्रकार होता. मंदार सर, जितेंद्र सर आणि मी जेवणानंतर एकत्र सुरुवात केली आणि काही वेळातच उजनी धरणाच्या आसपास पोहोचलो. येथून टेंभुर्णी आणि टेंभुर्णी वरून पंढरपूर चाळीस किलोमीटर हे डोक्यात ठेवून सर्वांचे सायकलिंग चालू होते. टेंभुर्णीच्या अलीकडे हॉटेल विजय येथे पाण्याचा स्टॉप तसेच सरबत घेऊन पंढरपूरकडे उजवीकडे वळालो. या रस्त्यावर जरी हा राष्ट्रीय महामार्गाचे लिहिलेले असले तरी त्या प्रकारची कोणतीही सोय नव्हती. प्रत्येक किलोमीटरवर दिसणारे मैलाचे दगड आता नकोसे झाले होते. एक पदरी रस्ता, ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या भरधाव गाड्या तसेच उलट्या बाजूने येणारे वारे हे सर्वच आमची परीक्षा पाहत होते. वारीचा खरा अनुभव येत होता कारण काही काळाने सायकल पंढरपूर 24 किलोमीटर असताना पंक्चर झाली. डोक्यावर ऊन, आजूबाजूला अजिबात नसलेली झाडे आणि रखरखाट तसेच आम्हाला वैयक्तिक रित्या पंक्चर काढण्यात आलेले अपयश आम्हाला विठ्ठलाची आठवण करून देते होते. त्यानंतर आमच्यासमोर खरा विठ्ठल उभा राहिला. ग्रुप वर मदतीचा मेसेज टाकल्यानंतर काही सेकंदातच मदतीसाठी उलटा फोन आला आणि दहा मिनिटात सपोर्ट ची गाडी आमच्या समोर दाखल झाली. सायकॉलॉजिस्ट या ग्रुपने सपोर्टचे काम अत्यंत उत्तमपणे पार पाडले. सायकलचे पंचर काढून झाल्यानंतर उरलेला प्रवास हा मनाची क्षमता पाहणारा होता. पुढचे 24 किलोमीटर या टप्प्यामध्ये चार पाण्याचे स्टॉप आम्ही घेतले. पाणी बाटलीमध्ये भरून घेतल्यानंतर गार पाणी पाचव्या मिनिटाला पुन्हा उकळल्यासारखे गरम होत होते यावरून उन्हाची तीव्रता लक्षात येईल. सीटवर बसणे सुद्धा कठीण झाले होते. उभे राहून सायकल चालवणे सुसह्य वाटत होते.

पंढरपूरच्या अलीकडे चार किलोमीटरवर तुकाराम बुवा खेडलीकर यांच्या आश्रमामध्ये एक महाकाय विठोबाची मूर्ती दृष्टीस पडली. इथेच विठुरायाला नमस्कार करून पुढचे शेवटचे चार किलोमीटरच्या अंतर पार करण्यास मनोबल देण्याची प्रार्थना करून पुढे निघालो. काही वेळातच गावामध्ये पत्ता विचारत विचारत सुसज्ज अशा विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासात दाखल झालो. येथे आयोजकांनी राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती. आम्ही पार्किंग मध्ये सर्व सायकल लावून जेवणासाठी पळालो. रात्री उशिरापर्यंत आमचा सायकल टेम्पोमध्ये चढविण्याचा कार्यक्रम सुरूच होता. रात्री खोलीमध्ये येऊन झोपण्यास बारा वाजले आणि त्यानंतर सुद्धा आयोजकांचे आमची सोय व्यवस्थित होईल यासाठी प्रयत्न सुरू होते. अतिश्रम झाल्यानंतर झोप लवकर लागत नाही असे म्हणतात त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मध्यरात्री कधी आमचे सहकारी जितेंद्र शहा पंढरपूर पुणे उलट वारीसाठी उठून गेले याचा पत्ताच लागला नाही. सकाळी वेळेत उठून विठ्ठल मंदिराचे कळस दर्शन घेतले.त्यानंतर नाश्ता घेऊन आठ वाजता पुन्हा पुण्याकडे वातानुकूलित अशा "ट्रॅव्हल विथ दामाजी" या गाडीतून निघालो. सोबत अद्वैत होताच. वाटेत पाटील वाडा या छोट्याशा पण सुनियोजित अशा ठिकाणी पुन्हा नाष्टा झाला. आम्हाला आमच्या पुढे मागे आमचे पुन्हा पुण्याला जाणारे सायकल वीर दिसत होते. त्यांना मनोमन नमस्कार केला. ११ तारखेला दुपारी १२.३०च्या सुमारास रेस कोर्स येथील मोकळ्या जागी आमची बस येऊन थांबली. काही वेळातच मी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याकडे सायकल घेऊन recovery ride ला सुरुवात केली.

वारीचा अनुभव अजूनही काही संपत नव्हता कारण विठ्ठलवाडी जवळ येतात सायकल पुन्हा एकदा पंक्चर झाली. आपल्या नेहमीच्या बालाजी सायकल वाल्याकडे सायकल पंचर काढून दुपारी तीन वाजता घरी दाखल झालो.

वेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा सहवास, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव, बारामती सायकल क्लब यांनी पंढरपूर येथे महाराष्ट्रातील सर्व सायकल प्रेमींचे आयोजित केलेले महासंमेलन तसेच विचित्र वातावरण अनुभवत स्वतःची क्षमता पाहणारा एक सुंदर असा अनुभव घेऊन सर्वजण आपल्या घरी परतले.
माझा संपर्क आयोजकांपैकी मोजक्या लोकांशी आला परंतु सारंग भिडे, आरती चव्हाण, राहुल सर आणि सायकॉलॉजीस्ट सपोर्ट टीम यांचे प्रयत्न माझ्या डोळ्यासमोर दिसून येत होते. तसेच सर्व पाण्याचे स्टॉप इतर वाहनांची व्यवस्था लावणे 
 तसेच जवळजवळ तीनशे च्या आसपास लोकांना सांभाळणे या गोष्टी नक्कीच सोप्या नाहीत. तीन संस्थांनी एकत्र येऊन केलेले प्रयत्न नक्कीच वाखण्याजोगे म्हणता येतील. यापुढे या संस्था यातून चांगला अनुभव घेऊन पुन्हा आम्हाला असेच चांगले अनुभव देत राहतील अशी खात्री वाटते. 

आपलाच 

भटका श्रेयस....