Sunday, June 7, 2020

औरंगाबाद मधील किल्ले उत्तरार्ध ( किल्ले जंजाळा, किल्ले वेताळवाडी आणि किल्ले सुतोंडा - नायगावचा किल्ला )


   
लहुगड झाल्यानंतर आमचा किल्ले जंजाळा कडे प्रवास सुरु केला. नाश्ता व्यवस्थित झाला होता. किल्ल्याच्या नावातच दम वाटत होता. नकाशाच्या माध्यमातून विचारत विचारत गावात आलो. मुस्लिमबहुल परिसर असल्याने आमच्याबद्दल , आमच्या पेहेरावाबाबत त्यांच्या डोळ्यात कुतूहल जाणवत होते. स्वातंत्र्यापूर्वी बराच काळ निजामशाहीच्या राजवटीखाली हा भाग होता त्यामुळे धर्मांतर खूप मोठ्या प्रमाणात झाले होते. असो.

    उन्हं डोक्यावर आली होती. गावातच एका वीट भट्टीच्या कडेला आम्ही गाडी लावून दुपारचे जेवण सोबत घेतले. ( जे आम्ही गड फिरून आल्यावर गाडीतच खाल्ले) पाणी भरलेल्या पाणपिशव्या खांद्यावर घेतल्या. जंजाळा  किल्ला गावाकडील बाजूने भुईकोट आहे आणि इतर बाजूंनी डोंगरी किल्ला आहे. वाटेवरूनच उजव्या हाताला शेजारच्या डोंगरात कोरलेल्या घटोत्कच लेणी नजरेस पडतात. लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पायर्‍यांची सोय केलेली दिसून आली. पायवाटेने किल्ल्याच्या तटबंदी फोडून तयार झालेल्या प्रवेशद्वाराजवळ आपण गावातून पाऊण तासात पोहोचतो. उन्हाचे चटके जाणवत होते. सगळ्यांना थोडे थोडे पाणी पिण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. संचातील एका सदस्यामुळे मी आणि शिवानी जरा दमाने चाललो होतो. तिला धीर देत कसेबसे आतल्या बाजूला असलेल्या तळ्यापाशी पोचलो. त्या सदस्याला थोडेसे खाण्याचे पदार्थ दिले आणि सगळ्यांच्या मागे आम्ही किल्ला पाहण्यासाठी पुढे सरकलो. 

                    जंजाळयावर सीताफळाची पुष्कळ झाडी होती. पण त्या रखरखीत उन्हामुळे पाने, फळे सर्व वठली होती. तळ्याच्या डावीकडे बुरुजाच्या अलीकडे जरंडा दरवाजा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना फारसी शिलालेख आहेत. तो दरवाजा आणि सभोवतालचा परिसर पाहून गर्द झाडीत दडलेल्या राणी महालाकडे निघालो. तेवढ्यात त्या झाडीतुन एक गोंडस हरणाचे पाडस उड्या मारत मारत आमच्या समोरून पसार झाले. कळपातून बहुदा चुकले असावे.
               

किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी भग्नावस्थेतील राणीमहालाचे अवशेष आहेत. काही शरमूर्ती दिसतात. तर उजवीकडून वळसा घालून पीरदर्गा( मंदिरांच्या अवशेषांवरुन बांधलेला), त्या शेजारील पाण्याचा तलाव ,उद्ध्वस्त कमानी पाहतच पुन्हा प्रवेशद्वाराकडे निघालो. गडावर पशुपक्ष्यांसाठी पाणी मुबलक असल्याने बरेच पक्षी पाहायला मिळाले. तळ्याकाठी विसावा घेणाऱ्या आमच्या साक्षीदाराला सोबत घेऊन मागे राहिलेल्या विश्वेश आणि चैतन्य यांना हाकतच गावाकडे निघालो. उन्हामुळे सगळेच तहानलेले होते. गावाजवळ आल्यावर एका मोठ्या विहीरीतून एका दादाकडून बाटल्या पुन्हा भरून घेतल्या आणि वेताळवाडीकडे निघालो. बऱ्याच किल्ल्यांची स्थानिक नावे, गावांची नावे ही कधीकधी नकाशा आणि तेथील स्थानिक लोक वेगळी वेगळी सांगतात. त्यामुळे एक जवळचा रस्ता सोडून आम्ही हळदा घाटातून वेताळवाडी किल्ला गाठला. डावीकडे वेताळवाडी धरण, मागे जंजाळा किल्ला, आम्ही मधोमध घाटामध्ये आणि घाटाच्या उजवीकडे रस्त्याला लागूनप्रतिम तटबंदीचा उभा असलेला वेताळवाडीचा किल्ला. अवर्णनीय. परदेशातील एखादे  लोकेशन मार खाईल असे किल्ल्याचे स्थान आहे. दुपारचे चार वाजून गेले होते. वेळ कमी असल्याने शिवानीने किल्ला पाहण्यासाठी एकच तास दिला होता. त्यात आम्ही बरेच जण चुकीच्या वाटेने चढत चढत , घसरत, काट्यांशी सामना करत किल्ल्याच्या मुख्य भागात पोचलो.

वेताळवाडीचा किल्ला

किल्ल्यावर पाण्याचे कोरडे टाके, एक उत्तम स्थितीमधील बुरुज, धान्यकोठार, तुपाचे मोठे रांजण, काही भग्नावस्थेतील वास्तू पाहण्यासारख्या आहेत. इथे आधीच्या किल्ल्याप्रमाणेच सीताफळांची मुबलक झाडे दिसली. किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि त्यावरील बुरूज पाहण्यासारखा आहे. सर्वांना हाकायची जबाबदारी यावेळी द्रुमन सांभाळत होता. माझीही त्याला मदत होतीच. बारदारी जवळ सर्वांचे मनसोक्त फोटोसेशन झाल्यावर तेथूनच समोर दिसणाऱ्या वाटेने उतरण्यास सुरुवात  केली. वाटेतच एक तोफ ओलांडून चोर दरवाजा पाहून वाडीच्या दिशेला असलेल्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही वेळातच गावात आलो. आमची  गाडी आम्हाला वर घाटात सोडून आधीच पायथ्याच्या येऊन थांबली होती. पण गावातील छोट्या मुलांनी एक विचित्र साहस करून आमच्या गाडीचे इंडिकेटर पळवले. बहुतेक बऱ्याच दिवसांनी गावात एखादी मोठी गाडी पाहिली असल्याने मुले चेकाळली असतील. असो.

इथून पुढचा आमचा थांबा होता नायगाव. परंतु अंधारामुळे, खराब रस्त्यांमुळे बरेच अडथळे पार करत गाव गाठले.  गुगलमॅपची चूक म्हणा अथवा रस्ता खराब असल्यामुळे गोची झाली. पण अशा अडचणीस्थानिकांनी मदत केली. वाडी गावातील उपसरपंच नायगाव पर्यंत वाट दाखवण्यासाठी आमच्या गाडी सोबत आले. लोकांना वाटत होते की लग्नाचे वऱ्हाड आलं की काय. इथल्या परिसरातील गावांपर्यंत पोहोचलेला विकास (ही गावे दोन तालुक्यांच्या सीमेवर असल्याने) पाहून विषण्ण वाटलं. ड्रायव्हरकाकांनी समजून-उमजून गाडी चालविल्याने कधी चालत, कधी गाडीतून, अशी कसरत करत रात्री साडे आठच्या सुमारास नायगाव मध्ये पोचलो. गावात आल्यावर नुसती जत्रा जमली होती. सगळे आमच्या आजूबाजूला जमा झाले. गावातील मंडळीना आमच्याबद्दल कुतूहल वाटत होते. वाडीतील उपसरपंचांनी अंगणवाडीतील जागा नायगावातील तरुणांच्या मदतीने आम्हासाठी उपलब्ध करून दिली. त्यांनी लाईटची व्यवस्था करून दिली. पाण्याचे दोन बॅरेल दिले. आमच्या आजूबाजूला गावकरी आम्ही काय करतोय हे पहात थांबले होते. शेवटी आम्हीच त्यांना काही मदत लागल्यास नक्की सांगू या बोलीवर जाण्याची विनंती केली.

आता मिशन खिचडी. गॅस शेगडी सोबत असल्याने आम्ही तीच वापरण्याचे ठरवले. सर्व सदस्य दिवसभराच्या धावपळीमुळे पेंगुळले होते. मग सर्वांना जागे ठेवण्यासाठी मी पाहिलेल्या किल्ल्यांची माहिती दिली. उमेशने संस्थेची माहिती देण्यास सुरुवात केली. मग हळूच वरूला बोलतं केलं. त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांचा सहभाग वाढला. माधवी काकुंचे Accupuncture चे उपचार प्रतीकवचालूहोते. अमेया आणि स्वप्नील यांनीही वीरगळ, सातीशीळा यांची छान माहिती सांगितली. एवढ्यात खिचडी तयार झाल्याची वर्दी मिळाली. गरमागरम खिचडीवर सगळे तुटून पडले. सोबतीला तूप आणि लोणचं होतंच. जेवण आटोपल्यावर अंगणवाडीच्या खोलीत आतमध्ये मुलींनी आणि बाहेर प्रांगणात मुले तर काहींनी गाडीतच झोपण्याचा पर्याय निवडला. अभिलाष आणि चैतन्य प्रतीककडून फोटोग्राफीचे धडे घेत होते. असेच सगळे एकमेकांशी गप्पा मारतच आपापल्या निवडलेल्या जागी झोपी गेले.

एक निवांत फोटो

शिवानीच्या प्लॅनिंगप्रमाणे तिने मोजक्या मेंबर्सना लवकर सकाळी उठवून नाश्त्याची तयारी चालू केली होती. कुशल पहाटेच उठून तयारीला लागला होता.  परंतु सगळ्यांच्या आवराआवरीमुळे आणि चहानाष्टामुळे  निघायला काहीसा उशीरझाला. सोबत एका काकांना वाटाड्या म्हणून घेऊन सुतोंडा किल्ल्याकडे निघालो. किल्ल्याचे मागील प्रवेशद्वार चकित करणारे आहे. मोठी तटबंदी फोडून हे प्रवेशद्वार कोरून काढलेले आहे. किल्ल्यात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गडावर ५२ पाण्याची टाकी आहेत.एक मोठे पाण्याचे टाके, तिथपासून पुढे असणारी जोडटाकी पहिली.  उध्वस्त प्रवेशद्वाराची कमान पाहून चोरदरवाजाने गावात उतरण्यास सुरुवात केली. डिसेंबर महिना असला तरीही गडावर बरीच झाडी वाढलेली होती. त्यामुळे बऱ्याच वास्तूंवर गवताचे आच्छादन होते.  तसेच पुढचा प्रवास लांबचा असल्याने काही भाग पाहायचे राहून गेले. सर्वात शेवटी मी, अमेया, प्रतीक आणि कुशल गावात पोचलो. गावातील एका झाडाखाली ठेवलेल्या सुबक, अप्रतिम विष्णूमुर्तीचे फोटो काढून गावकऱ्यांचे आभार मानून चाळीसगावकडे प्रस्थान केले.

विष्णुमूर्ती

पाचोरा, चाळीसगाव मार्गे  मालेगाव बायपासला एका छानशा ढाब्यावर पोटोबा शांत केला. जेवायला बराच उशीर झाला होता. सर्वांची भूक कडाडली होती. जेवणात या बाजूला  सर्वत्र नावाजलेली शेवभाजी आणि मसाला भात सर्वांनी दाबून हाणला. जेवण आटोपून साडे चारच्या सुमारास नाशिककडे निघालो. नाशिककडे जाताना चांदवड, इंद्राई, धोडप,रवळ्या-जवळ्या , कांचन – मंचन अभेद्य किल्ल्यांचे दर्शन झाले. Feedback Session मध्ये अनेकांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले.फॅन्टॅस्टिक फोरच्या शंकांचे शिवानी आणि उमेशने योग्य निरसन केले.

मला आणि स्वप्नीलला नाशिकला सोडून डोंबिवलीकर पुढे निघाले. आम्ही दोन वाजण्याच्या सुमारास पुण्यात आलो. असे अनवट, आडवाटेवरील  किल्ल्यांवर घेऊन जाण्यात ट्रेकक्षितीज संस्थेचा हातखंडा आहे. त्यामुळे ट्रेकक्षितीज टीमचे आणि ऐनवेळी अंगावर जबाबदारी पडून देखील ती उत्कृष्ठपणे निभावलेल्या ट्रेक लीडर शिवानी वेदुलाचेही आभार.

बिनविषारी सापाला मारताना कळवलेल्या प्रतिकला सलाम, कराडवरून इतक्या लांब आलेल्या स्वप्निलला सलाम, कुशल आणि उमेशमधील कुकला सलाम, फॅन्टॅस्टिक फोरच्या इच्छाशक्तीला सलाम,  लागू काकु  आणि माधवी काकूंमधील तारुण्याला सलाम. ज्यांनी ज्यांनी हा ट्रेक समृद्ध केला त्या सर्वांना सलाम!!!

मराठवाडा सर करणारे शिलेदार

 

 


4 comments:

  1. The way u express ur journey, it seems that we r also travelling . Keep going .

    ReplyDelete
  2. श्रेयस वर्णन एकदम उत्तम आहे.वाचताना आपण स्वतः या मोहिमेत सहभागी आहोत आसे वाटते. धन्यवाद श्रेयस

    ReplyDelete
  3. वा श्रेयस खूप छान वर्णन अप्रतिम खरच आपण तिथे आहोत असे वाटतं

    ReplyDelete
  4. सर्वांचे मनापासून धन्यवाद...कृपया यापुढे कमेंट लिहिताना आपल्या अधिकृत खात्यावरून लिहिल्यास किंवा खाली नाव लिहिल्यास उत्तर देणे सोपे होईल....👍

    ReplyDelete